

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव असून देशातील भाजपच्या शेवटाची सुरुवात आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
निकालानंतर बोलताना रोहित पाटील म्हणाले, मी स्वत: सीमावर्ती कर्नाटकात प्रचाराला गेलो होतो तेंव्हा तेथील वातावरण बघून मतदार भाजपला थाराच देणार नाहीत याचा अंदाज आला होता. भाजपला त्यांचा पराभव डोळ्यांसमोर दिसू लागताच बजरंगबलीला मैदातान उतरवले. परंतू काडीचाही उपयोग झाला नाही.
या निवडणूकीत कर्नाटकातील मतदारांनी फोडाफोडीच्या राजकारणाचीही संधी भाजपला मिळू नये यासाठी काँग्रेसला स्पष्ट बहूमताची सत्ता दिली आहे. तसेच भाजपच्या धार्मिक जातीयवादी राजकारणाला कसलाच थारा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या बहूतांशी बड्या नेत्यांनी जंग जंग पछाडूनही तेथील जनतेने त्यांच्यापेक्षा दुप्पट काँग्रेसचे आमदार निवडून दिले.
यावरुन या देशातील जनतेचा भाजप आणि त्यांच्या नेत्यांवरील विश्वासच उडालाचे चित्र दिसते. यापुढील काळात देशातील प्रत्येक निवडणूकीत भाजपचा जनाधार हा कमी होत गेलेला दिसेल. महाराष्ट्र राज्यातही यापुढील काळामध्ये होणा-या निवडणूकीत मतदार भाजपला तांदळातील खड्याप्रमाणे बाहेर काढेल, यामध्ये आता तीळमात्र शंका नाही. कर्नाटकचा निकाल म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणूकीत होणा-या सत्तांतराची नांदी आहे. असं मत रोहीत पाटील यांनी व्यक्त केलं.