Sharad Pawar withdraw resignation : शरद पवारांचे घुमजाव; राजीनामा मागे घेण्याची घोषणा | पुढारी

Sharad Pawar withdraw resignation : शरद पवारांचे घुमजाव; राजीनामा मागे घेण्याची घोषणा

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी आज (दि.५) केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने सकाळी पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी ही घोषणा केली. (Sharad Pawar withdraw resignation)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी ही माहिती दिली. या वेळी पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार त्यांच्यासोबत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, आमदार संग्राम जगताप, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, माझ्या निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र भावना उमटल्या होत्या. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. खरंतर या जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा होती. पण अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घेण्याची या सर्वांनी विनंती केली. त्यामुळे मी त्यांच्या भावनांचा अनादर करू इच्छीत नाही. (Sharad Pawar withdraw resignation) तुम्‍हा सर्वांमुळे आपल्‍या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सहकारी अस्‍वस्‍थ झाले होते. मी या निर्णयामध्ये बदल करावा, यासाठी सर्वांनी मला आवाहन केले होते. त्‍याचबरोबर विशेषत: विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मीच अध्यक्ष राहावा, अशीही विनंती केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे माझ्यावर असलेले प्रेम आणि निष्‍ठा यामुळे मी माझा राजीनाम्‍याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

यापुढे पक्षाचे जोमाने काम करणार आहे. पक्षाचा उत्तराधिकारी तयार झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्षात काही संघटनात्मक बदल केले जातील. परंतु, नवे पद निर्माण करण्याचा कोणताही विचार नाही. सर्व सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. महाविकास आघाडीत आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहे. महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार नाहीत. याबाबतच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व सहकारी माझे उत्तराधिकारी आहेत. अजित पवार दिल्लीला गेल्याची माहिती चुकीची आहे, ते नाराज नाहीत. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाऊ इच्छितात हे सर्व खोटे आहे, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

२ मे रोजी पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन समारंभात पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवाराच्या निर्णयांचे पक्षातून तीव्र पडसाद उमटले. राज्यभरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली. पवारांच्या निर्णयाचे मोठे पडसाद राज्याच्या आणि देशाच्या राजकारणतही उमटले. पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्नही चर्चेला आला होता. पण शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली.

हेही वाचा 

Back to top button