Rahul Gandhi : अदानींच्या कंपन्यांमध्ये ‘ईपीएफओ’​​ची गुंतवणूक; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल | पुढारी

Rahul Gandhi : अदानींच्या कंपन्यांमध्ये 'ईपीएफओ'​​ची गुंतवणूक; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पैशांच्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी आज (दि.२७) ट्विट करून पंतप्रधान मोदी यांना कशाची भीती वाटते, असा सवाल केला आहे.

एलआयसीतील गुंतवणूक अदानीला! एसबीआयचे भांडवल, अदानीकडे, ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे! ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेच्या निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? पंतप्रधान, चौकशी नाही, उत्तर नाही! शेवटी एवढी भीती का?, असा सवाल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

वास्तविक, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अनेक बड्या गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही ईपीएफओमध्ये ठेवलेल्या पैशाचा मोठा हिस्सा अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये गुंतवला गेला आहे. गौतम अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सची नावे यामध्ये समाविष्ट आहेत. ईपीएफओच्या बोर्ड सदस्यांची एक बैठक होणार आहे. ज्यामध्ये गौतम अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये ईपीएफओ​​ची गुंतवणूक चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ईपीएफओ​​कडे सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे २८ कोटी गुंतवणूकदारांच्या ठेवी आहेत. ईपीएफओ 50-50 रुपये एक्सचेंज लिंक्ड ETF मध्ये गुंतवते. दर महिन्याला, तुमच्या पगारातून कापून घेतलेल्या आणि तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा मोठा भाग तुमच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवला जात आहे. ईपीएफओ ​​ही एक सामाजिक सुरक्षा संस्था आहे. जिच्याकडे १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आहे.

हेही वाचा 

Back to top button