नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप | पुढारी

नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज रविवारी (दि.26) मालेगावी शिवगर्जना विराट मेळावा होतोय. तब्बल 10 वर्षानंतर तेही, पुर्वापारचे शिलेदार दादा भुसे यांनी साथ सोडल्यानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावात दाखल होत असल्याने ठाकरे गटाने जोरदार तयारी केली असून, खुद्द खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे शहरात ठाण मांडून होते. त्यांच्या देखरेखेखाली संपूर्ण नियोजन होत असून, त्यांनी रविवारी दुपारी सभास्थळाची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना आयोजक उपनेते डॉ. अद्वय हिरे व पदाधिकार्‍यांना केल्या  आहेत.

शिवसेना दुभंगल्यानंतर अस्तित्वाच्या लढाईसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे यांची तब्बल 10 वर्षानंतर मालेगावात सभा होतेय. पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्याविरोधात ऐतिहासिक सभा घेण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. कॉलेज मैदानावर भव्य असे व्यासपीठ उभारले आहे. सुमारे एक लाख लोकांसाठीआसनव्यवस्था झाली आहे. मुख्य व्यासपीठावर एक स्कीन, तर उर्वरित सभा मैदानात आठ स्क्रीन असतील. यासह सभास्थळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेचे अग्निशमन पथक सज्ज ठेवले आहेे. तसेच शहरातील तीनही अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना मनपा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी दिल्या आहेत. गिरणा अ‍ॅग्रो कंपनीतील कोट्यवधींच्या गुंतवणुकीवरून सुरु झालेल्या आव्हान- प्रतिआव्हानाने या सभेला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. भुसेसेना आणि ठाकरे सेना या एकमेकांच्या पुढ्यात असल्याने सभा सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनही अलर्ट मोड आहे. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच दोन अपर पोलिस अधीक्षक, पाच पोलिस उपअधीक्षक, 22 पोलिस निरीक्षक, 55 पोलिस उपनिरीक्षक, 570 कर्मचारी, 60 वाहतूक पोलिस कर्मचारी, तीन आरसीपी तुकड्या असा मोठा फौजफाटा सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात तैनात आहे. सभेला उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या वाहनांनी शहरांतर्गत वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये, यासाठी प्रवेशमार्गांवरच कार्यकर्त्यांसाठी वाहनतळाची व्यवस्था झालेली आहे.

मालेगाव छावणी www.pudhari.news

कुणाचे होणार वस्त्रहरण
शिवसेनेत बंडाळी माजलेली असताना सर्वात शेवटी बाहेर पडणार्‍यांमध्ये दादा भुसे होते. त्यांच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तेव्हा ते कोणत्या घटनाक्रमाचा वृत्तांत वाचतात, याकडे राज्याचे लक्ष असेल. शिवाय, पाडव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’केंद्री केलेल्या वक्तव्यांचा ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, याविषयी उत्सुकता असेल.

जालन्याचा पादचारी शिवसैनिक मशालीसह दाखल
शिवसेना म्हटली की कट्टर शिवसैनिक असा शब्दप्रयोग होताच. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर तर या शब्दाला विशेष महत्व प्राप्त झालेय. असा एक सैनिक जालना येथून मशाल घेऊन रविवारी सभास्थळी दाखल झाला. अंकुश पवार असे या शिवसैनिकाचे नाव. तो नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेने मनमाडपर्यंत आला. तेथून हातात मशाल, गळ्यात भगवा परिधान करुन त्यानेे पायी मालेगाव गाठले. सभास्थळी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी त्याचे कौतुक केले.

हेही वाचा:

Back to top button