आमदार सरोज अहिरे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार : माजी आमदार योगेश घोलप | पुढारी

आमदार सरोज अहिरे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार : माजी आमदार योगेश घोलप

नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : देवळाली विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच विविध विकासकामांची उद्घाटने केली. त्या सर्व कामांना मी आमदार असताना २०१८ मध्ये मंजुरी मिळवलेली आहे. त्यामुळे आमदार सरोज अहिरे ह्या केवळ आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करीत आहे. असा आरोप करून यापुढे त्याची पुनरावृत्ती झाल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी पत्रकार परिषदेत केला.

विहितगाव येथील संपर्क कार्यालयात गुरूवारी (दि.७) माजी आमदार घोलप यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रसिध्दी मध्यामांसोबत बोलतांना घोलप यांनी सांगितले की, आमदार सरोज अहिरे यांनी त्यांच्या कार्यकाळात काही कामे केली असेल तर अश्या कामांना माझा विरोध असण्याचे काही कारण नाही. त्यांनी त्यांच्या हिंमतीवर पाठपुरावा करून मतदारसंघात विकासकामे मंजूर करून घ्यावीत. त्यांचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करावे असे ते म्हणाले.

देवळाली बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, खासदार हेमंत गोडसे यांना विकासकामे कोणी मंजुर केली याविषयी कल्पना आहे. त्यांना देखील याबाबत विचारणा केली तर सत्यता समोर येईल. त्याचप्रमाणे मतदारसंघातील २१ गावात पाणी पुरवठा योजना अंतर्गत ३१ कोटी रुपयाचा निधी माझ्या कार्यकाळात मंजुर केलेला आहे. काही गावात याच निधीची कामे अजूनही सुरूच आहे. त्यांनी नव्याने कोणती कामे मंजुर केलेली नाही. केली असेल याविषयी त्यांनीच जाहीर माहिती दिली पाहिजे. उगाच विनाकारण जनतेची दिशाभूल करू नये. असे घोलप यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

तर कार्यक्रम होऊन देणार नाही

माझ्या कार्यकाळातील मंजूर विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम आमदार सरोज अहिरे यांनी तातडीने थांबवायला हवे. तसे झाले नाही तर मतदार संघात विकासकांमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. शिवसैनिक कार्यक्रमात घुसून कार्यक्रम बंद पाडून शिवसेना स्टाईलने उत्तर देतील.विकासकामांच्या श्रेयाबाबत शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल. असे घोलप यांनी सांगितले.

नासाका बाबतही दिशाभूल

नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. पण याविषयी देखिल आमदार सरोज आहीरे यांनी खो घालण्याचे काम केले. निविदा प्रक्रियाच्या अटी शर्ती मध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना बदल करण्यास भाग पाडले. पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली.आता तर त्यामधील नविन अटी शर्तीच्या तरतुदीनुसार कोणी निविदा भरेल किंवा नाही . असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.होणारे काम त्यांच्या हस्तक्षेपामुळे लांबणीवर पडले.त्यांना नासाका पुन्हा सुरू करावयाचा आहे किंवा नाही. याविषयी घोलप यांनी शंका उपास्थित करून आमदार अहिरे यांना नासाका चालवायला घ्यायचा असेल तर त्यांनी खुशाल घ्यावा. आम्ही विरोध करणार नाही. पण जनतेची दिशाभूल थांबवायला हवी. असे आव्हान देखील घोलप यांनी दिले.

पुराव्यासह पत्रकार परिषद घेणार – आमदार सरोज अहीरे

मतदार संघातील कामकाजासाठी मुंबईला आलेली आहे. गुरूवारी रात्री उशीरा पर्यंत नाशिकला पोहचेल. याविषयी राष्ट्रवादीच्या वारिष्ट नेत्यांसोबत चर्चा केली जाईल. मतदार संघातील विकास कामांच्या मंजुरीचे पुरावा घेऊन भुमिका स्पष्ट केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विकासकामांचे खोटे उदघाटन केली.माजी आमदार योगेश घोलप यांनी केलेला हा आरोप अत्यंत निंदनीय आहे. बड्या आणि ज्येष्ट नेत्याविषयी आरोप करताना , बोलतांना पथ्य पाळणे आवश्यक आहे.

कांदे-भुजबळ नंतर आता घोलप-अहिरे वाद

जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यात निधी वाटपावरून झालेल्या वादाचे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर आता देवळाली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश घोलप आणि विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यात विकासकामांच्या श्रेयावरून वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी विरोधात शिवसेना असा राजकीय संघर्ष आगामी काळात दिसू शकतो.

 हे ही वाचलं का?

Back to top button