जळगाव : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) रोजी आले असताना धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा तीव्र घोषणा त्यांनी दिल्या. त्यांचा बंदोबस्त करताना मात्र यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व चौकशी करण्यासाठी आलेले होते. धरणगाव तालुक्यात आले असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला. त्यांना खोके दाखवून, तसेच त्यांच्या ताफ्यावर कापूस फेकण्यात आला. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है” “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा देऊन अब्दुलसत्तार व राज्य सरकारचा ठाकरे गटाने निषेध केला.
तर यावेळी आंदोलनात ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ, निलेश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कापसाला १० ते १२ हजार भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती गुलाबराव वाघ यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा:
- पुणे: जी 20 च्या प्रसिद्धीसाठी 75 लाख खर्च; आयुक्त परिषद, सुशोभीकरण, प्रसिद्धीसाठी 2 कोटी 21 लाख
- अदिती राव हैदरीचा रेड लव्ह फोटोजेनिक लूक
- नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी