नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू : पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांचे उडान | पुढारी

नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू : पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांचे उडान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुप्रतिक्षित इंडिगो कंपनीने अखेर नाशिकमधून आपली विमानसेवा सुरू केली असून, बुधवारपासून (दि.१५) गोवा, अहमदाबाद, नागपूर या तीन शहरांसाठीच्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३६६ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

एचएएल व इंडिगो कंपनीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही शहरांसाठीच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एचएएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिब्येंदू मयती, व्यवस्थापक साखेत, उपव्यवस्थापक सिंगल, विमानतळ संचालक दोडवे, विमानतळ व्यवस्थापक नितीन सिंग, इंडिगोचे महाराष्ट्र सेल्स संचालक अजय जाधव, ऑपरेशन डायरेक्टर मोर्गेसन, न्यू स्टेशन स्टार्टअप डायरेक्टर गुरुप्रीत, महाराष्ट्र ॲण्ड गोवा सेल्सचे गौरव जाजू, विमानतळ व्यवस्थापक आशिष अब्राहम, आयमा एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रथम प्रवाशाला तिकीट देण्यात आले. तसेच केक कापून सेवेला प्रारंभ करण्यात आला.

नाशिकच्या विमानतळावरून स्पाइस जेट या कंपनीकडून दिल्ली, हैदराबादसाठी सेवा सुरू आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये अचानकच दोन कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्याने, केवळ स्पाइस जेटकडूनच सेवा सुरू होती. अशात इतर कंपन्यांच्या देखील सेवा सुरू केल्या जाव्यात यासाठी स्थानिक उद्योजकांसह राजकारणी मंडळींकडून पाठपुरावा केला जात होता. दरम्यान, इंडिगोच्या सेवेमुळे नाशिकच्या विमानसेवेला बळकटी मिळाली असून, सुरुवातीपासून मागणी असलेल्या नाशिक-गोवा विमानसेवेमुळे नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर अहमदाबाद व नागपूरसाठी सेवा सुरू केल्याने उद्योग, व्यवसायासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.  इंडिगो कंपनीच्या पथकाने गेल्या महिन्यातच ओझर विमानतळाला भेट देऊन पाहणी केली होती. आता या सेवा सुरू झाल्याने या तिन्ही ठिकाणांहून नाशिककरांना अन्य शहरे व राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान, सेवेच्या पहिल्या दिवशी प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

असा मिळाला प्रतिसाद

नाशिक-गोवा – ६१, गोवा-नाशिक – ५५

नाशिक-अहमदाबाद – ६६, अहमदाबाद-नाशिक – ६६

नाशिक-नागपूर – ५३, नागपूर-नाशिक – ६५

हेही वाचा:

Back to top button