Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी, राऊतांचा शिंदे गटावर आरोप | पुढारी

Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी, राऊतांचा शिंदे गटावर आरोप

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आज नाशिकमधील एक बाई शिवसेनेमधून दुसऱ्या पक्षात गेली. ती किती लाखात गेली? शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटाने नाशिकमध्ये एजंट सोडले आहेत. ते एजंट दहा-बारा लाख रुपयांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यवहार करतात. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश केलेल्या लोकांच्या हातात लाख सव्वा लाखच पोहोचवतात. राज्यात खोक्यात, तर शहरात लाखात फोडाफोडी केली जात आहे. अशा गद्दारांना जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या भाषणातून केला.

शिवसेना उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना बोलत होते. शिवसेनेचं आणि नाशिकचं एक वेगळं नातं आहे. शिवसेनेचे पहिले अधिवेशन हे नाशकात झाले आणि त्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली. म्हणून नाशिकवर बाळासाहेबांचे प्रेम होते, उद्धव ठाकरेंचं प्रेम आहे. नाशिकची शिवसेना आजही मजबूत आहे आणि भविष्यात अशीच मजबूत राहील, यात शंका नाही. शिवसेना ही तरुणांची फौज आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या देशात २८० सेना स्थापन झाल्या, पण फक्त दोनच सेना शिल्लक राहिल्या आणि त्या म्हणजे भारतीय सेना आणि शिवसेना. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव कोणी करू शकणार नाही. शिवसेनेचे अस्तित्व संपून जावे, शिवसेना नष्ट व्हावी, यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कारस्थान सुरू आहे. परंतु अशा कारस्थानांच्या छातीवर पाय देऊन उद्धव ठाकरे उभे आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः सध्या दिल्ली-मुंबई ये-जा करत आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी परंतु मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि त्यासोबतच नाशिक व ठाणे महापालिकेवरदेखील शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा त्यांनी केला.

बनकर पहाटेचे साक्षीदार

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा धागा पकडत राऊत यांनी आमदार दिलीप बनकर हेदेखील त्या घटनेचे साक्षीदार असल्याचे बनकर यांच्याकडे पाहत फडणवीसांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.

मला ११० दिवस तुरुंगात टाकले

सध्या राज्यात राजकीय वातावरण बदलत आहे. या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात टाकले. मी अजिबात खचलो नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मला दिल्लीच्या सर्वोच्च पदापर्यंत नेले, मला तेथे केंद्र सरकारकडून जी वागणूक मिळाली त्याबद्दल मी अजूनपर्यंत काहीही बोललेलो नाही. पण २०२४ मध्ये सत्तेवर येताच आपण व्याजासकट परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

रडायचे कशाला मर्दाची छाती आहे, वाघाचे काळीज आहे, भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. तुरुंगात हसत हसत हा भगवा फडकावत गेलो आणि बाहेर आलो. तेव्हाही असाच भगवा फडकावत आलो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ज्या वेगाने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित झपाट्याने पुढे जात आहे, ते पाहिल्यावर माझ्या मनात अजिबात शंका नाही की, २०२४ मध्ये फक्त नाशिकच काय तर संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. नाशिकवर भगवा फडकविण्याची आपली जबाबदारी अधिक असून, पंचवटीसह नाशिकमधून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

माजी नगरसेविकेला आमिष दाखवलं

झाडावरील काही पानं गळून पडत असतात तशी नाशिकमधील काही पानं गळून गेली आहेत. पानं गळून गेल्याशिवाय नवीन बहर येत नाही. आजही जी माजी नगरसेविका गेली तिला काही तरी आमिष दाखवून घेऊन गेल्याचे कानावर आले. त्यामुळे अशा पानगळीनंतरच नवीन बहर येताना सध्या मला नाशिकमध्ये दिसत आहे. राजकारणात जेव्हा काही नवीन व मोठे घडते ते नाशिकमधूनच घडते. एवढे पावित्र्य नाशिकच्या भूमीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, सुनील बागूल, शुभांगी पाटील, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, वसंत गिते, विनायक पांडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button