महाराष्ट्रातील ४५ पक्ष्यांच्या प्रजातींवर टांगती तलवार; उरले फक्त दोन माळढोक, ७ प्रजाती अतिसंकटग्रस्त

महाराष्ट्रातील ४५ पक्ष्यांच्या प्रजातींवर टांगती तलवार; उरले फक्त दोन माळढोक, ७ प्रजाती अतिसंकटग्रस्त
Published on
Updated on

शहाजी पवार, लातूर : आपल्या उपजत लावण्याने सृष्टी सौंदर्य खुलवणाऱ्या आणि पर्यावरण संतुलनातही महत्वाचे योगदान देणाऱ्या पक्षांच्या अनेक जाती अधिवासातील मानवी हस्तक्षेप तसेच विविध कारणांनी संकटग्रस्त झाल्या आहेत. मरणाच्या दाढेत अडकलेल्या महाराष्ट्रातील अशा ४५ प्रजातींच्या पाखरांची यादी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जाहीर केली आहे. त्यांच्या संरक्षण अन संवर्धनासाठी सर्वांच्या सहद्यी सहकार्याची अपेक्षा करीत त्याची अनिवार्यताही बीएनएचएसने सांगितली आहे.

बीएनएचएसने जाहीर केलेल्या अतिसंकटग्रस्त पक्षीप्रजातीत ७, संकटग्रस्तमध्ये ९ तर संकटसमिप गटात २९ प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात कधी काळी मोठ्या संख्येत आढळणारे माळढोक माळरानावरील अतिक्रमणामुळे आता के‌वळ दोनच राहीले आहेत. अधिवासक्षेत्रातून गेलेल्या उच्च दाबांच्या विद्यूत तारा तसेच पवनचक्यांच्या धारदार पात्यांना धडकून अनेक पक्षी मरण पावले आहेत, शिवाय भटक्या कुत्र्यांचेही ते सावज ठरले आहेत. झुडपी जंगलात आढळणारा जेर्डनचा धाविकही मोजक्या संख्येत राहीला आहे. याशिवाय संघ टिटवी, राजगिधाड, पांढरपाठी गिधाड, गुलाबी डोक्याचे बदकही अतिसंकटग्रस्त पक्षांच्या यादीत गेले आहे.
पानझडी अधिवासाचा रहास व चोरट्या शिकारीमुळे रानपिंगळ्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

स्थलांतर करुन येणारा मोठा क्षेत्रबलाक गेली अनेक वर्षांपासून आढळला नसल्याने तो राज्यातून नामशेष झाला की काय? अशी शंका घेतली जात आहे. पूर्वी राज्यातील अनेक भागात आढळणारे पांढरे गिधाड तसेच पांढऱ्या पुठ्ठयाचे गिधाड आता अभावानेच दिसत आहे. मृत गुरांच्या मासांची चणचण, वाढते साथरोग, गुरांत होणारा प्रतिजैविकांचा वापर यामुळे या पक्षांच्या वंशवृध्दीवर विपरीत परिणाम होत आहे. अकोला, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ आदी भागात पूर्वी आढळणारा तणमोर आता अधिवास व शिकारीमुळे कमी संख्येत राहीला आहे. नदीकाठी होत असलेल्या मानवी अतिक्रमनामुळे काळ्या पाठीचा सुरय आता दुर्मीळ झाला आहे. पानथळीच्या जागा नष्ट होत असल्याने शिकारी पानपक्षांची संख्या रोडवली आहे. यात पल्लासच्या मत्स्य गरुड, स्टेपी ईगल या प्रजातींचा समावेश आहे. संकट समिप असलेल्या प्रजातीत २९ प्रजाती असून त्यात लाल डोक्याचा ससाणा, करण पोपट, नदी टिटवी, गुलाबी छातीचा पोपट, पांढुरक्या भोवत्या, तीरंदाज (सापमान्या), मलबारी कवड्या धनेश, लग्गर ससाणा, राखी डोक्याचा मत्स्य गरुड, राखी डोक्याचा बूलबूल, थिकनी, नयनसरी बदक, युरेशियन कुरव, कुरल तुतारी, करडे गिधाड, काळ्या शेपटीचा मालगुजा, छोटा रोहित, काळ्या मानेचा करकोचा, ब्लॅक हेडेड गॉडविट, काळ्या डोक्याचा शराटी, टायटलरचा पर्ण वटवट्या, कालव फोड्या, तुरेवाली टिटवी, पट्टेरी शेपटीचा पाणटिवळा, बाकचोच तुतारी आदींसह अन्य दोन प्रजातींचा समावेश आहे.

…तर अनेक प्रजाती लुप्त होतील

विकास व उत्पन्नाच्या नावाखाली केली जाणारी वृक्षतोड, कारखानदारी, पवनऊर्जा प्रकल्प अशा अनेक कारणांपोटी होणारी माळरानाची बेसुमार ओरबड, तापमानवाढ, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर व याकडे होणारे व्यवस्थेचे दुर्लक्ष या पाखरांच्या जीवावर उठले आहे. यावर वेळीच आवर न घातल्यास अनेक प्रजाती काळाच्या पडद्याआड जातील, असा इशारा पक्षीतज्ञांनी दिला आहे.

लोकसहभाग महत्वाचा

पक्षी प्रजातीवर आलेले संकट गंभीर असून ते थोपवण्यासाठी वन्यजीवसंवर्धनात लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. गावागावांत वन्यजीव संवर्धनावर जनजागरण करावे. बालवयात वन्यजीवसंवर्धनाचा संस्कार व्हावा. विकास जरुर करावा परंतु तो पर्यावरण अन जौवविधतेला मारक नसावा. केवळ अभयारण्यातच प्राणी रहातात असे नाही असंरक्षीत क्षेत्रातही त्यांची संख्या मोठी असते. जिथे त्यांचा अधिवास आहे तिथे विकासप्रकल्प टाळले जावेत.
– डॉ. सुजित नरवडे, सहाय्यक संचालक बीएनएचएस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news