हत्तीचा वन विभागाच्या कार्यालयातच धुडगूस | पुढारी

हत्तीचा वन विभागाच्या कार्यालयातच धुडगूस

आजरा, पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यात गेल्या 12 वर्षांपासून धुमाकूळ घालणार्‍या हत्तीने आता वन विभागालाच लक्ष्य केले आहे. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साळगाव (ता. आजरा) येथील वनपरिक्षेत्र कार्यालय संशोधन केंद्रात हत्तीने धुडगूस घातला. या कार्यालयाच्या गेटचे हत्तीने नुकसान केले. तसेच बांबू रायझोम संशोधन क्षेत्रातील बांबू पिकाची नासधूस केली.

गेले अनेक दिवस हत्ती आजरा शहरानजीकच्या रामतीर्थ जंगल क्षेत्रात वावरत आहे. सायंकाळच्या वेळेला आजरा-साळगाव व आजरा सोहाळे मार्गावर वाहनधारकांना तो दर्शन देत आहे. रविवारी पहाटे हत्ती साळगाव गावानजीक आला. प्रकाश हरमळकर यांच्या शेतात त्याने मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली. बांधकाम व्यावसायिक असणार्‍या हरमळकर यांच्या शेताचे तारेचे कुंपण तोडून हत्तीने शेतात प्रवेश केला. तेथे डांबराची भरलेली सहा बॅरेल हत्तीने इतस्ततः भिरकावून लावली.

Back to top button