IND vs SL : टीम इंडिया नो बॉलवर ‘आऊट’ | पुढारी

IND vs SL : टीम इंडिया नो बॉलवर ‘आऊट’

पुणे, पुढारी वृत्तसेवा : IND vs SL : पुणे येथे झालेल्या दुसर्‍या टी-20 (IND vs SL) सामन्यात श्रीलंकेने भारताला 16 धावांनी हरवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका हा काळ बनून उभा राहिला. शनाकाने शेवटच्या षटकांत 21 धावा चोपल्या तर भारताला विजयासाठी 21 धावांची गरज असताना त्याने शेवटचे षटक टाकत फक्त 4 धावा देत सामना जिंकून दिला. श्रीलंकेने भारतात 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 मध्ये विजय मिळवला आहे. अर्शदीपने दोन षटकांत 5 नो बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 नो बॉल टाकला. भारताने नो बॉल अन् फ्री हिटवर 22 पेक्षा जास्त धावा दिल्या. या 22 धावांनीच घात केला.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने 22 चेंडूंत नाबाद 56 धावा ठोकत भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान गाठताना भारताने अक्षर पटेल (65) आणि सूर्यकुमार यादव (51) यांच्यामुळे 8 बाद 190 धावा केल्या. IND vs SL

IND vs SL : श्रीलंकेचे 207 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्या तीन षटकांतच तीन धक्के बसले. इशान किशन (2) दुसर्‍याच षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या चेंडूवर किशनची विकेट अन् अखेरच्या चेंडूवर शुभमन गिल (5) याला माघारी पाठवून रजिथाने भारतावरील दडपण वाढवले. दिलशान मदुशंकाने तिसर्‍या षटकात पहिल्याच चेंडूवर पदार्पणवीर राहुल त्रिपाठीची (5) विकेट घेतली अन् पुण्याच्या स्टेडियमवर सन्नाटा झाला. हार्दिक पंड्याही 12 धावांवर बाद झाला अन् भारत अडचणीत सापडला. चमिका करुणारत्नेही ही विकेट घेतली. आघाडीचे 4 फलंदाज 34 धावांवर माघारी परतले. दीपक हुडाही 9 धावांवर बाद झाला अन् भारताने 57 धावांवर निम्मा संघ गमावला.

57 धावांत 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ कमबॅक करत नाही असेच वाटले होते. पुण्याच्या स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकही शांत बसले होते, पण सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी वातावरण बदलले. त्यांच्या फटकेबाजीने पुन्हा एकदा स्टेडियम जिवंत बनवले. अक्षरने 20 चेंडूंत अर्धशतक झळकावताना षटकारांची आतषबाजी केली. 15व्या षटकापर्यंत दोघांनी 35 चेंडूंत 82 धावांची भागीदारी केली होती. भारताला अखेरच्या 5 षटकात 68 धावा करायच्या होत्या. (IND vs SL)

पण अर्धशतक झाल्यानंतर सूर्यकुमार बाद झाला. अन् भारतीयांचा ठोका पुन्हा चुकला. शिवम मावीने दोन षटकार एक चौकार ठोकून सामना अजून संपला नसल्याचे दाखवून दिले; परंतु भारताचा संघर्ष 17 धावांनी कमी पडला. अक्षर पटेल 31 चेंडूंत 65 धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या 50 चेंडूंत संघाच्या 80 धावा झाल्या होत्या. सलामीवीर कुसल मेंडिसने (52) अर्धशतक झळकावले, पण यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला.IND vs SL

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडिस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खासकरून मेंडिसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी 8.2 षटकांत 80 धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

IND vs SL : भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेटस् घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते. पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने (22 चेंडूंत 56 धावा) आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या 206 धावांपर्यंत नेली. शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल 7 नो बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंकेला खुले मैदान फटके मारण्यासाठी मिळाले. भारताकडून सर्वाधिक विकेटस् उमरान मलिकने घेतल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून 3 विकेटस् घेत त्याला साथ दिली.

हे ही वाचा :

पुणे : पासवर्ड बदलून पाच लाख लंपास

Back to top button