समृद्धी महामार्ग : समृद्धी महामार्गावरील वेगावर येणार नियंत्रण, अपघात रोखण्यासाठी बसवणार 'स्पीड गन' | पुढारी

समृद्धी महामार्ग : समृद्धी महामार्गावरील वेगावर येणार नियंत्रण, अपघात रोखण्यासाठी बसवणार 'स्पीड गन'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर सुरु असलेले सततचे अपघातांचे सत्र लक्षात घेता परिवहन विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन (समृद्धी महामार्ग) बसवून वाहनांच्या गतीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. १२० किमी प्रतीतास वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात समृद्धी महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर बैठक बोलावली होती. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

समृद्धी महामार्ग : वेगाला आळा घालण्यासाठी स्पीड गन

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यानंतर हा मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या मार्गावर वेगमर्यादांचे कुठलेही बंधन पाळले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील १८ दिवसातच या मार्गावरील विविध भागात किमान ४० अपघात झाल्याची व त्यात ७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीची अधिकृत आकडेवारी एमएसआरडीसीकडून अद्यापही देण्यात आलेली नाही.
या अपघातांची दखल घेऊन राज्य सरकारने उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वेगवेगळ्या उपाययोजनांवर चर्चा झाली. तुर्तास या महामार्गावर वेगाला आळा घालण्यासाठी स्पीड गन (Speed Gun ) बसविली जाणार आहे.
हेही वाचा

Back to top button