ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या | पुढारी

ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, येत्या रविवारी (दि. १८) यासर्व ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि. १७) ईव्हीएम आणि मतदार साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या १ हजार २९१ जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी २ हजार ८९७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. तसेच थेट सरपंचांच्या १७७ जागांसाठी ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या. शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गावागावांमधून रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण ढवळून निघाले. थेट प्रचाराचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने उमेदवार व समर्थकांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जात आहे. त्यामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागण्यात येत आहे.

गाव पातळीवर थेट प्रचाराची सांगता झाली असताना, प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींसाठी ७४५ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यानुसार तालुका स्तरावर यापूर्वीच ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ४ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व कर्मचारी शनिवारी (दि. १७) दुपारनंतर ईव्हीएम आणि मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना होतील. तत्पूर्वी तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे अखेरचे प्रशिक्षण दिले जाईल.

बागलाणला तीन ग्रामपंचायती बिनविरोध…

जिल्ह्यातील एकूण १९६ ग्रामपंचायतींमध्ये माघारीनंतर ७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये बागलाणमधील किकवारी बु., ढोलबारे व महडचा समावेश आहे. तसेच कोटमगाव (ता. नाशिक), नारायणगाव (ता. चांदवड) व जयपूर (ता. कळवण) आदी ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या. तसेच सदस्यांच्या ५७९ आणि थेट सरपंचांच्या १९ जागाही बिनविरोध झाल्या.

हेही वाचा:

Back to top button