राज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही | पुढारी

राज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही

पुढारी ऑनलाइन डेस्क : राज्यपालांनी माफी मागितली नाही याची खंत वाटते. तसेच प्रक्रियेनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई होईल याची खात्री आहे, असा विश्वास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वशंज व सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याबाबत ते पंतप्रधान मोदींशी चर्चा करून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत त्यांनी पंतप्रधानांपुढे महाराष्ट्राची बाजू मांडली.

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अवमानकारक विधाने केल्यानंतर छत्रपतींचे वशंज असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. निर्धार शिवसन्मानाचा अशी परिषद घेऊन त्यांनी पुण्यात शिवप्रेमींना एकत्र केले. तर रायगडावर आक्रोश आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

उदयनराजेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली. राष्ट्रपतींनी उदयनराजेंची ही तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवली. तरीही अद्याप राज्यपालांबाबत निर्णय होत नसल्याने खा. उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता मोदींनी उदयनराजेंना भेटीची वेळ दिली होती. या भेटीत उदयनराजे गुजरातच्या विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. राज्यपालांबाबत तसेच महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वातावरणावर तोडगा काढण्याची मागणी उदयनराजे मोदींकडे करणार आहेत.

त्यानुसार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. राज्यपालांनी माफी मागितली नाही, याची खंत वाटते. तसेच आतापर्यंत कारवाई व्हायला हवी होती. तरी ही मी पंतप्रधान मोदी यांना प्रक्रियेनुसार कारवाई करावी, असे पत्र पाठवले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी याचा गांभीर्याने विचार करतील, अशी खात्री वाटते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

गदगमध्ये महाराष्ट्राची वाहने पुन्हा लक्ष्य;मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचे दहन

work from home | मोठी बातमी! आयटी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’साठी डिसेंबर २०२३ पर्यंत परवानगी

Back to top button