नाशिकमध्ये आश्रम संस्थाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयितास कोठडी | पुढारी

नाशिकमध्ये आश्रम संस्थाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयितास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ परिसरात द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्थाचालकाने १४ वर्षीय मुलीस हातपाय दाबण्यास सांगून तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संस्थाचालक हर्षल ऊर्फ सोनू बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या विरोधात पोक्सोसह, अत्याचार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलिसांनी संशयित हर्षल मोरे यास अटक केली आहे.

त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय आलोक विशाल शिंगारे या चिमुकल्याचा खून झाल्यानंतर आश्रमातील चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणानंतर तीन दिवसांनी म्हसरूळ येथील आश्रमात चिमुकलीवर संस्थाचालकाने अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संस्थाचालक हर्षल मोरे हा गुरुकुल आश्रमाचे काम पाहत असून, त्याने जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील गाेरगरीब, बेघर कुटुंबातील मुला-मुलींना गोळा करून एका राे हाउसमध्ये वसतिगृह सुरू केले आहे. यात १३ मुलींचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यातील दानशूर नागरिकांशी संपर्क साधून गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व दैनंदिन खर्चासाठी तो देणग्या स्वीकारत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पेठ तालुक्यातील सुरगाणे-उंबरपाडा परिसरातील १४ वर्षीय मुलगी गुरुकुल आश्रमामार्फत शिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टाेबर व १२ नाेव्हेंबरला पीडितेस संशयित मोरे याने हातपाय दाबण्यास रो-हाउसमधील पार्किंगमध्ये बनवलेल्या पत्र्याच्या रूममध्ये बोलवले. पीडितेकडून हात-पाय दाबून घेत असताना त्याने त्याच्याकडील मोबाइलमधील अश्लील चित्रफीत पीडितेस दाखवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्यास विरोध केला असता त्याने हाॅस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. यामुळे पीडिता घाबरली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला हर्षलने पुन्हा पीडितेस हात-पाय दाबण्यास बोलवून अत्याचाराचा प्रयत्न केला. यामुळे पीडितेने तेथून पळ काढत खोलीत गेली. ही बाब तिने तिच्या चुलत बहिणीस सांगून आश्रमातून घरी गेली. त्यानंतर पीडितेने नातलगांना सोबत घेऊन म्हसरूळ पोलिस ठाणे गाठले व हर्षल विरोधात फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना या करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने इतर मुलींवरही अत्याचार केल्याचा संशय आहे. तक्रारी आल्यानंतर मुलींची वैद्यकीय तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

संशयितास पोलिस कोठडी

पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी म्हसरूळला धाव घेत घटनेची माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास बुधवार (दि.३०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असून, प्राथमिक तपासात आश्रमाला परवानगी नसल्याचे दिसते. हॉस्टेलमधील इतर मुलींची चौकशी केली जात असून, हॉस्टेल सोडून गेलेल्या मुलींकडेही चौकशी केली जाणार आहे. संशयितास पोलिस कोठडी मिळाली असून, सखोल तपास केला जाईल. -किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ एक

हेही वाचा :

Back to top button