कोल्हापुरात कमळ फुलणार : ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

कोल्हापुरात कमळ फुलणार : ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपने आपल्यावर सोपविली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता कोल्हापुरात कमळ फुलणार, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दिवसभरच्या भरगच्च कार्यक्रमानंतर सायंकाळी शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या निवास्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी आपला सारा भर संघटनात्मक मजबुतीवर दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक काम वाढविण्याचे भाजपने ठरविले आहे. कोल्हापूरसाठी पक्षाने माझी निवड केली आहे. दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम करत आहे. दिवसभर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच समाजातील विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपने राबविलेले कार्यक्रम आणि विविध उपक्रम जनतेच्या मनावर सखोल ठसा उमटल्याचे जाणवले. कोल्हापुरातील भाजपचे संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांची उर्जा पाहिल्यानंतर कोल्हापूरमध्ये लोकसभेला निश्चित कमळ फुलेल. महाराष्ट्रात आघाडी सरकार आहे. शिंदे गट व भाजप यांचे सरकार आहे. त्यामुळे जागांबाबत प्रथम राज्यातील नेते चर्चा करतील. त्यानतंर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतले जातील. पण या सर्वांना अजून खूप वेळ आहे. सध्या संघटनात्मक बाबींवरच अधिक लक्ष आहे.

मार्च 203 पर्यंत नवीन टर्मिनल उभारणार

हवाई वाहतूक क्षेत्रात काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात जेवढी प्रगती झाली नाही तेवढी प्रगती गेल्या आठ वर्षात झाली आहे. आठ वर्षांपूर्वी 74 विमानतळ हाते. गेल्या आठ वर्षात 69 विमानतळ झाले. कोल्हापूर विमानतळाला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली त्यावेळी तेथे असलेल्या त्रुटी दूर करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार धावपट्टीचे विस्तारीकरण व नाईटलँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगून शिंदे म्हणाले, आणखी एक टर्मिनल बिल्डिंग मार्च 2023 पर्यंत तयार होईल. कोल्हापूरच्या संस्कृतीला अनुकूल असे डिझाईन केले जाईल. 1 हजार 780 मीटरचा रनवे तयार झाला आहे. 2 हजार 300 मीटरच्या रनवेची गरज आहे. त्यासाठी 64 एकरची जमीन विमानतळ प्राधीकरणाला दिल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. एक रस्ता वळवावा लागेल, त्याच प्रमाणे उच्चदाब वाहिन्या आणि महावितरणच्या वाहिनी स्थलांतरीत कराव्या लागतील. मुंबई व बेंगळूर कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर प्रगती आणि विकासाच्या मार्गावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे त्यासाठी सहकार्य मिळत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आ. सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राहुल चिकोडे, विजय जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button