दिवाळीत ‘फराळ’तर करा, पण आरोग्याचीही काळजी घ्या

दिवाळीत ‘फराळ’तर करा, पण आरोग्याचीही काळजी घ्या
Published on
Updated on

'दिवाळी' म्हटली की नजरेसमोर येते फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी आकाशकंदील, लहान-मोठ्या वेगवेगळ्या रंगांच्या आकाराच्या रांगोळ्या आणि त्याचबरोबर फराळाचे नवीन पदार्थ. सगळ्यांसाठी एक वेगळी गंमत, एक वेगळी मजा असते. डाएट किंवा वजन कमी करणार्‍या लोकांसाठी मात्र ही दिवाळी थोडीशी कटकटीची ठरू शकते. पण जर आपल्या प्रकृतीला काहीही त्रास न होता आणि फराळाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला दिवाळी साजरी करायची असेल तर नेमके काय करायला हवे? प्रत्येक वयामध्ये दिवाळीचे पदार्थ खाण्याची इच्छा आपल्याला होतच असते. त्यामुळे हे पदार्थ खाऊन, त्याचा आस्वाद घेऊन जर दिवाळी साजरी करायची असेल तर मुख्य मुद्दे असतात की फराळाचे पदार्थ कधी खायचे? किती खायचे? आणि कसे खायचे?

प्रत्येक वयोगटामध्ये या तीन प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतात. प्रथम, मुलांनी खरे तर कोणत्याही वेळी म्हणजे नाश्ता, जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण यामध्ये फराळाचे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. फक्त महत्त्वाचं हे आहे की, नाश्ता म्हणून फराळ किंवा जेवण म्हणून फराळ कधीही करू नये. नाश्त्यामधील कुठल्याही पदार्थाबरोबर फराळाचे पदार्थ खावेत किंवा जेवणामध्ये इतर आहारासोबत एखादा लाडू, चकली किंवा करंजी तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता.

फराळाचे पदार्थ नाश्ता म्हणूनच पोटभर खायला दिले तर तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे मुलांना खोकला होण्याची किंवा पोटात दुखण्याची शक्यता असते. काही मुलांमध्ये जंतही होऊ शकतात. फराळाचा कुठलाही पदार्थ हा 'पौष्टिक' नसतो. पण 'पूरक' असतो. नुसताच लाडू किंवा नुसतीच चकली खाण्यापेक्षा पोहे आणि लाडू, शेव आणि उपमा, इडली आणि लाडू/करंजी असं तुम्ही मुलांना देऊ शकता; पण जेवणाऐवजी किंवा नाश्त्याऐवजी जर फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले तर मुलांना आवश्यक असणार्‍या वाढीसाठी उपयुक्त असणार्‍या गोष्टी त्यांना मिळत नाहीत. त्यामुळेच दिवाळीच्या दिवसांत बर्‍याच मुलांचे वजन कमी होते.

साधारणपणे 20 ते 40 या वयोगटातील व्यक्तींना फराळ मनापासून करायचा असतो, पण वजनवाढीची तलवार सतत मानेवर लटकत असते. त्यामुळे बर्‍याचदा डाएटच्या नावाखाली फराळाचे पदार्थ कमी खाण्याकडे या व्यक्तींचा कल असतो, पण दिवाळी वर्षातून एकदाच येणारा सण आहे. फराळाचे पदार्थ बाजारात सर्रास उपलब्ध असले तरी शक्यतो इतर वेळी आपण घरी ते करत नाही. त्यामुळे दिवाळीत 'फराळ'तर करायचा, पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करायचा.

नाश्त्याच्या कुठल्याही पदार्थाबरोबर किंवा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही फराळातील कुठलाही पदार्थ थोडा म्हणजे साधारण 1 ते 2 लाडू किंवा 2 ते 3 करंजी किंवा 2 ते 3 चकली या प्रमाणात खाऊ शकता. पण जेवणानंतर किंवा नाश्ता म्हणून तुम्ही वाटीभरून शेव, लाडू, करंजी असे पदार्थ खाल्ले तर मात्र, वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. जेवताना सुद्धा शक्यतो फराळ करू नये. वजन न वाढवता फराळाचे पदार्थ खायचे असतील तर दोनच वेळा अशा आहेत, त्यापैकी एक वेळ म्हणजे नाश्त्याबरोबर म्हणजे सकाळी 8 ते 10 यावेळेत किंवा संध्याकाळी 4 ते 6 या काळात. रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणानंतर लगेच फराळ कधीही करू नये. कारण, जेवणाबरोबर खाल्ल्यास पित्त जास्त वाढण्याची शक्यता असते.

चाळिशीनंतर आपल्या पोटाची पाचक रस तयार करण्याची क्षमता थोडी कमी झालेली असते. त्यामुळे या वयोगटामध्ये फराळाचे पदार्थ खाण्याची वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याबरोबर. जर पोहे किंवा उपीट किंवा दही -पोहे याबरोबर कुठलाही फराळाचा पदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ला तर पचायला जास्त त्रास होत नाही. म्हणूनच पूर्वीपासून दही पोह्याबरोबरच चकली, शेव, करंजी, लाडू, चिवडा खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. दही पोह्यांसाठी वापरलेले दहीसुद्धा अदमुरं म्हणजे अगदी ताज आणि गोड असायला हवं. थोडक्यात, फराळाबरोबर फळे, दही न ताक रोज आहारात ठेवा. त्यामुळे फराळाचे पदार्थ 'घशाशी' येणार नाहीत. फराळाबरोबरच रोज अर्धा ते पाऊण तास व्यायामाची साथ सोडू नये. तसे केल्याने वजन वाढण्याची शक्यताच उरणार नाही.

मंजिरी फडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news