तुळजापूर: नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शहरात येणारे मार्ग दोन किलोमीटर अंतरावर बंद | पुढारी

तुळजापूर: नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शहरात येणारे मार्ग दोन किलोमीटर अंतरावर बंद

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारे मार्ग दोन किलोमीटर अंतरावर बंद करण्यात आले आहे. बायपास रोडवरून वळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मुख्य शहरातील अंतर्गत रस्तेदेखील बंद करण्यात आले आहेत.

तुळजाभवानी देवी दर्शनासाठी नवरात्र काळात बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे दूर करून रस्त्याच्या मधोमध बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद करून पायी येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी नगरपरिषद प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दीपक संघ चौकातून घाटशीळ मार्गे झुलत्या मनोऱ्यामधून दर्शन मंडपात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश पास यापूर्वीच बंद करण्याची घोषणा प्रशासनाने केल्यामुळे पारंपारिक पद्धतीने भाविकांना दर्शन घेता येणार आहे. भाविकांचे दर्शन कमी वेळेत व्हावे यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शहरात सार्वजनिक ठिकाणी पोलीस चौकी आणि प्रथम उपचार केंद्र उभे करण्यात आले आहेत. तीन चाकी रिक्षा आणि दोन चाकी वाहनांना गावांमध्ये फिरण्यासाठी ठराविक ठिकाणी छोटे रस्ते सोडले असून मोठ्या गाड्यांना प्रवेश बंद असणार अहे.

उस्मानाबाद रोडवरील वाहन तळ अद्यावत करून तेथे स्वच्छता आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नळदुर्ग रोडवरील वाहनतळ यावर्षी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे असणाऱ्या नवीन न्यायालय इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आले आहे. कर्नाटक मार्गातून येणाऱ्या भाविकांना नवीन न्यायालयाच्या जागेपासून रिक्षा अथवा पायी यावे लागणार आहे. लातूर रोडवरील भाविकांना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे थांबविण्यात येणार आहे. तसेच सोलापूर मार्गाहून येणाऱ्या भाविकांना उड्डाणपूल येथून आरादवाडी वाहनतळ येथे सोडण्यात येणार आहे.

असा असेल बंदोबस्त 

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाह्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते 23 सप्टेंबर पासून बंद करण्यात येत आहेत. या यात्रेच्या दरम्यान 23 पासून सुरु होणारा पोलीस बंदोबस्त नवरात्र महोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा यादरम्यान पर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती तुळजापूरचे पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांनी दिली.

तुळजापूर येथे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधीक्षक दर्जाचे अधिकारी, 14 विभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी 35 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी 70 एपीआय दर्जाचे अधिकारी चार एस आर पी बटालियन कंपनी ५० महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी 1000 पोलीस कर्मचारी आणि 1000 गृह रक्षक दल कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

हेही वाचा 

छत्रपती शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान मोठे : शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Video) 

सहकाराचा काहींकडून राजकारणासाठी वापर, शरद पवार यांचे नाव न घेता निर्मला सीतारामन यांची टीका 

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महाबौद्ध धम्म मेळावा 

Back to top button