नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस | पुढारी

नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. कोरोनानंतर प्रथमच आदिमायेचे मंदिर नवरात्रीमध्ये दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जुने सीबीएस, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानकासह विभागातील आगारनिहाय अडीचशे जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेण्यासाठी यंदा विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी बसस्थानकातूनच सप्तशृंगीच्या दर्शनासाठी लालपरी सोडण्यात येणार आहे. थेट गडासाठी इतर आगारांतून बसेस धावणार नसून, भाविकांना खासगी, लालपरी अथवा पर्यायी वाहनाने नांदुरी गाठावी लागणार आहे. शहरातील जुने सीबीएस बसस्थानक येथून वणी येथे जाण्यासाठी 45 बसेस दर अर्ध्या तासाला धावणार आहेत.

सप्तशृंगीगडावर 26 सप्टेंबरपासून नवत्रोत्सव यात्रेला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरला हा उत्सव संपणार असला तरी कोजागरी अर्थात 9 ऑक्टोबरपर्यंत या बसेस सुरू राहणार आहेत. एसटी प्रवासी वाहतूक सेवा 24 तास असणार आहे. भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार आहे. दरम्यान, वणी गडावर जाणार्‍या भाविकांसाठी सीबीएस बसस्थानक परिसरात एसटी महामंडळाच्या वतीने नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या केंद्रात अधिकार्‍यांकडून बसेसची वेळेसह मंदिर परिसराची माहिती देण्यात येणार आहे.

नांदुरीगड दर पाच मिनिटाला बस
दोन वर्षांनंतर भाविकांना सप्तशृंगीदेवीचे निर्बंधमुक्त दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात राज्यभरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे. भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन होण्यासाठी नांदुरी ते वणी गडासाठी दर पाच मिनिटाला बस धावणार आहे. तसेच मालेगाव, सटाणा, सिन्नरसह विभागातूनदेखील नवरात्रोत्सवासाठी कोजागरीपर्यंत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button