Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण; 31 वर्षीय युवकाला लागण | पुढारी

Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण; 31 वर्षीय युवकाला लागण

पुढारी ऑनलाईन: दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. या रूग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रूग्णाचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला रुग्ण 31 वर्षांचा आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या तरूणाला ताप आणि त्वचेच्या जखमा अशी लक्षणे आढळून आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आत्तापर्यंतच्या माहितीनुसार देशात मंकीपॉक्सचे चार रूग्ण आढळले आहेत. संबंधित युवक हा मनाली (हिमाचल प्रदेश) येथे झालेल्या पार्टीत सहभागी झाला होता. पश्चिम दिल्लीचा रहिवाशी असलेला या युवकामध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणे दिसल्याने तीन दिवसापूर्वी येथील मौलाना आझाद रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने शनिवारी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. जे पॉझिटिव्ह आले आहेत, असे एजन्सीने सांगितले आहे. जगात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय सर्व विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.

कोरोनानंतर जगभरात चिंतेचा विषय ठरलेला मंकीपॉक्स हा साथरोग प्रकारातील आजार जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. त्यात यावर विस्तृत चर्चा झाली होती. अखेर सार्वजनिक आरोग्याच्या द‍ृष्टीने हा विषाणू घातक असल्याचे स्पष्ट करीत डब्ल्यूएचओने शनिवारी जागतिक आणीबाणीची घोषणा करीत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button