

अक्कलकोट ; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट शहरातील शेख नूरदिन बाबा दर्ग्याजवळ 35 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शनिवारी (दि. 21) सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. महेश सुरेश मडीखांबे (वय 35, रा. भीमनगर अक्कलकोट) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत याप्रकरणी महेशचा भाऊ हर्षद मडीखांबे याने पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
अक्कलकोट शहरातील भीमनगर येथील महेश मडीखांबे यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी गल्लीत राहणार्या दिलीप मडीखांबे बरोबर भांडण झाले होते. त्यात महेशने दिलीपवर चाकूहल्लाही केला होता. त्यावेळी महेशला अटकही झाली होती.
अधूनमधून महेश हा दिलीप सोबत फिरत होता. त्यावेळी महेशचे भाऊ त्याला 'तू दिलीप सोबत फिरू नको पूर्वी मारलेला राग त्यांच्या मनात असून तुला काहितरी दगाफटका करतील सावध रहा' असे समजावून सांगायचे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 20) रात्री आठ वाजता मयत महेशने घरात भोजन केले. त्यावेळी भाऊ हर्षद हा घराबाहेर थांबला होता. त्यावेळी त्याच गल्लीतील दिलीप शिवप्पा मडीखांबे व यल्लपा भीमराव मडीखांबे हे दोघे येऊन महेश याला घरातून बाहेर बोलावून घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी महेशसोबत गावात काम आहे म्हणून सांगितले होते. त्यानंतर महेश रात्रभर घरी परतलाच नाही.
दरम्यान, शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हर्षद मडीखांबे हा मड्डीवरून कामाला जात होता. त्यावेळी शेख नूरदिन बाबा दर्ग्याजवळ लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी त्याने जवळ जावून पाहिले असता त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर कशाने तरी मारून चेहरा ओळखू येऊ नये या उद्देशाने छिन्नविच्छिन्न केला होता. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
हर्षदने जवळ जावून पाहिले असता पायातील चप्पल, मास्कवरून मृतदेह भाऊ महेश याचा असल्याची असल्याची खात्री झाली. त्यानुसार त्याने उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी शहरातील दोघांना संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत.