पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 238 जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण बारामती तालुक्यात आहे. आंबेगावमध्ये 95 जलस्रोत हे दूषित पाण्याचे आढळले. 3 हजार 551 पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात 7 टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते.
यामध्ये या गावांमध्ये पाण्याच्या टाकीची दुरवस्था, जलवाहिन्यांना गळती असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने टीसीएलचा वापर परिणामकारक वापर, आवश्यक तेथे तुरटीचा वापर तसेच पाण्यातील क्लोरीन तपासणीसाठी क्लोरोस्पोपचा वापर व या अनुषंगाने नोंदवह्या ठेवाव्यात. त्याचबरोबर पिण्याच्या पाणी स्रोतांच्या शंभर फूट परिसरातील स्वच्छता करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे तालुक्यांतील तपासणी केलेल्या गावांमध्ये एकही गावामध्ये दूषित पाणी आढळले नाही. मावळमध्ये 156, मुळशी तालुक्यामध्ये 104 तसेच भोर 312 आणि वेल्हेमधील 19 पाण्यांचे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील पाण्यांचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासल्यानंतर अहवाल तयार करण्यात येतो. वीस टक्क्यांहून कमी क्लोरीन असलेल्या गावांची संख्या एकही नसल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
दूषित पाणी प्यायल्याने विविध आजारांचा त्रास
दूषित पाणी प्यायल्याने आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते.
तालुकानिहाय दूषित जलस्रोत
आंबेगाव – 33, बारामती – 95, दौंड – 7, हवेली – 14, इंदापूर – 18, जुन्नर – 43, खेड – 9, पुरंदर – 7, शिरूर – 12
हेही वाचा :