शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील काही नगरसेवकही एकनाथ शिंदेंसोबत | पुढारी

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील काही नगरसेवकही एकनाथ शिंदेंसोबत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निकालानंतर शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा असणारे आमदार एकनाथ शिंदे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. आधी बराच वेळ शिंदे कुठे होते याची कोणालाही माहिती नव्हती, मात्र त्यानंतर शिंदे हे सुरतला एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती सूत्रांतर्फत मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण, डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचे काही नगरसेवकदेखील आ. एकनाथ शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला  आहे.  या सगळ्या घटनांचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपचे ५ आमदार निवडून आले. मात्र एका काँग्रेसच्या आमदाराचा पराभव झाला. त्याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील भाजपनेच बाजी मारली होती. भाजपवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना, विधान परिषदेच्या निकालानंतर अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. साेमवारी (दि.२०) रात्रीपासून शिवसेनेचा मुख्य चेहरा असणारे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे अचानक नॉटरिचेबल झाले. ते नेमके कुठे गेलेत हे कोणालाच ठाऊक नव्हते. मात्र काही तासांनी ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये ३५ आमदारांसह मीटिंग घेत आहेत अशी माहिती मिळाली.

विधान परिषद निवडणुकीत त्यांना विचारण्यात आले नसल्याने, त्यांनी ही नाराजी व्यक्त केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र याचबरोबर कल्याण-डोंबिवली ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ला असणारी शहरे असल्याने यामध्ये शिंदे यांचे वर्चस्व देखील तेवढेच आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे कल्याण डोंबिवली बालेकिल्ल्यातील अनेक नगरसेवक देखील त्यांच्याबरोबर सुरतमध्ये सहभागी आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार असल्याचे दिसणार आहे.
नगरसेवक आणि कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदेंबरोबर असल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ठाण्यातील काही शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि आमदार यांना वर्षा बंगल्यावर बोलवून घेत, त्यांची बैठक घेतली आहे.

Back to top button