राज्यात ‘मे’मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगारांना रोजगार : मंत्री राजेश टोपे

राज्यात ‘मे’मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगारांना रोजगार : मंत्री राजेश टोपे
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे २०२२ अखेर ६८ हजार ४४३ उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी २०२१ मध्ये राज्यात २ लाख १९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

मंत्री टोपे म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९५ हजार ४५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

मंत्री टोपे म्हणाले की, मे २०२२ मध्ये विभागाकडे ३३ हजार ६७७ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ६७९, नाशिक विभागात ४ हजार ३९५, पुणे विभागात १८ हजार १५८, औरंगाबाद विभागात २ हजार २२६, अमरावती विभागात १ हजार ५०० तर नागपूर विभागात १ हजार ७१९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

मे मध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५५६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ०२७, नाशिक विभागात २ हजार ३२७, पुणे विभागात सर्वाधिक १४ हजार ३१३, औरंगाबाद विभागात ३३३, अमरावती विभागात ३४८ तर नागपूर विभागात २०८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news