पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा 'उद्योग' मनसेच्या संदीप देशपांडेना भोवणार ! गुन्हा दाखल | पुढारी

पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा 'उद्योग' मनसेच्या संदीप देशपांडेना भोवणार ! गुन्हा दाखल

मुंबई, पुढारी ऑनलाईन : पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे. त्यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासंदर्भात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

नेमकं प्रकरण काय घडलं होतं? 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाज झाले. आता एक वाजताचे नमाज पठण असून त्याआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही पोलीस ताब्यात घेणार होते. पण राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटले.

यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाल्या आहेत. संदीप देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथून जाण्यास सांगितले जात होते. देशपांडेही तिथे आले होते. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी माध्यमांशी बोलल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन वाहनात बसवण्यासाठी नेत होते.

देशपांडेंभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता, पण तेवढ्यात देशपांडेंच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणून उभी केली. पोलिसांची नजर चुकवून देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. हे लक्षात येता पोलीस गाडीच्या मागे धावले पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती.

गृह मंत्रालयाकडून कारवाईचे स्पष्ट आदेश 

या प्रकरणाची दखल राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतली असून देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले आहेत. ते म्हणाले, “मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत”, अशा आशयाचे ट्विट गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले होते.

पहा व्हिडिओ : भोंग्यांच्या बाबतीत कायदा काय सांगतो ? | विधितज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत

Back to top button