राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प?

राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प?

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 2014 पासून रुग्णांसाठी मोफत 108 रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. रुग्णवाहिकांवरील चालकांनी विविध मागण्यांसाठी एक सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील चालक संपात सहभागी होणार आहेत. नगर जिल्हा तसेच तालुक्यातील चालकांनी काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. 108 रुग्णवाहिकेवर चालक नियुक्त करण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर बीव्हीजी कंपनीकडून दिलेले आश्वासन पाळले नाही.

कर्नाटक, तामिळनाडू राज्यात चालकांना आठ तासासाठी तीस हजार रुपये, तर बारा तासांसाठी 38 हजार रुपये वेतन देण्यात येते. परंतु महाराष्ट्र राज्यात बारा तासांसाठी 16 ते 19 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अशोक कराळे, अतुल शिंदे, भीमराज मोकाटे, हर्षल तोडमल, दत्ता मेहेत्रे, भाऊसाहेब बंगे, मयूर बोळे, शिवाजी औटी, वाल्मिक शितोळे, सतीश शिरसाठ, प्रशांत टुपके, पोपट केकाण, ज्ञानेश्वर गोल्हार, जालिंदर राऊत, जगन्नाथ खेमणार, किशोर घनवत यांनी आदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती दिली.

राज्यातील 108 रुग्णवाहिकेवरील चालकांच्या मागण्या रास्त आहेत. मुलांचे शिक्षण व इतर खर्च याचा विचार करून चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात.अन्यथा कामबंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

-अशोक कराळे,
जिल्हाध्यक्ष, 108 चालक संघटना

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news