हिंगोली नाका परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी | पुढारी

हिंगोली नाका परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी

वाशिम, पुढारी ऑनलाईन : आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान हिंगोली नाका ते रेल्वे स्टेशन रोडवर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमध्ये दोन्ही गटातील एकूण ७ जण जखमी झाले असून काहींवर सामान्य रुग्णालय येथे तर काही जखमीला खाजगी रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध लावण्यात आले. त्यामध्ये आठवडी बाजार सुद्धा बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज रविवार असल्याने काही भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तर काहींनी हिंगोली नाका ते रेल्वे स्टेशन रोडवर दुकान लावण्यासाठी जागा पकडली. ही जागा पकडण्याच्या वादावरून दोन्ही गटातील भाजीपाला विक्रेतांंच्या आपसात वाद निर्माण झाला आणि काही वेळातच या वादाचे  तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले.

या घटनेमध्ये  एका गटातील शेख नबी शेख गुलाब (वय-६०), शेख सलीम शेख नबी (व-३२), शेख आवेस शेख महबूब हे जखमी झाले तर दुसऱ्या गटातील कैलास इंगोले (वय-४०), आकाश कैलास इंगोले (वय-२१), रूखमणी कैलास इंगोले (वय-४०), सुभाष पुंडलिक भडके (वय-५४) वर्ष हे जखमी झाले आहे. घटनेचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहे.

या घटने नंतर  पोलीस प्रशासन सतर्क

आज सकाळी घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेत बाजार समिती बाहेरील भरलेला आठवडी बाजार उठवला. मात्र, याच प्रकारे शहरातील पाटणी चौकात अशीच गर्दी वाढत असून कोरोनाला निमंत्रण देण्याचा काम होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून येथील भाजी बाजार शहराबाहेर हटवावा, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.

Back to top button