पालघर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली आहे. आचार संहिता जाहिर झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 19 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
रायगड लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, अंमली पदार्थ विरोधी विभाग, पोस्ट विभाग, इंडियन कोस्ट गार्ड, एअरपोर्ट ऑथोरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून अवैध दारु विक्री, रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम मध्ये नोंदविण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सर्व कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी
दिली आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने रायगड लोकसभा मतदार संघातील पेण विधानसभा मतदार संघात 2 हजार 717, अलिबाग विधानसभा मतदार संघात 1 हजार 09, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 2 हजार 482, महाड विधानसभा मतदार संघात 1 हजार 479 तर मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार संघात 2 हजार 783, कर्जत विधानसभा मतदार संघात 3 हजार 687 व उरण विधानसभा मतदार संघात 402 पोस्टर्स, बॅनर्स, पँम्पलेट असे एकुण 14 हजार 559 हटविण्यात आले.