पंढरपूर : कार्तिकी यात्रा कोरोना नियमांच्या अधीन राहून भरविण्याचा निर्णय

पंढरपूर : कार्तिकी यात्रा कोरोना नियमांच्या अधीन राहून भरविण्याचा निर्णय

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी यात्रा कोरोना नियमांच्या अधीन भरविण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने बैठकीद्वारे घेतला आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोरोना आटोक्यात आल्यानंतर घटस्थापनेपासून राज्यात सर्वत्र धार्मिर्कंस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यांतर्गत विठ्ठल मंदिरही खुले करण्यात आले आहे. आता कोरोना नियमांचे पालन करूनच दर्शन दिले जात आहे. कार्तिकी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 15 रोजी साजरा होत आहे. श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरिता खुले झालेले आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रा भरवावी की नाही? याबबात रविवारी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत कार्तिकी यात्रा भरवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सज्ज आहे. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना बैठकीनंतर मंदिर समितीकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

औसेकर महाराज म्हणाले, शासन निर्णयानुसार येणार्‍या प्रत्येक भाविकाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येणार्‍या सर्व भाविकांची गैरसोय होणार नाही, भाविकांची काळजी घेण्यास मंदिर समिती तयार आहे. त्यामुळे सकारात्मक द़ृष्टिकोनातून मंदिर समिती यात्रेसाठी तयार आहे.

ते म्हणाले, कार्तिकी यात्रेला येणार्‍या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे म्हणून दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे. त्याचबरोबर पलंग काढल्यापासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत ऑनलाईन दर्शन बंदच असणार आहे.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे लक्ष

औसेकर महाराज म्हणाले, जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वाखरी पालखी तळ अशा विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली होती. पाहणीनंतर कार्तिकी यात्रेबाबत मंदिर समितीने प्रस्ताव सादर केल्यास शासनाला प्रस्ताव पाठवून निर्णय शासन निर्देशानुसारच घेण्यात येईल, असे सांगितले होते. आता सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यानुसार दि. 31 रोजी मंदिर समितीने कार्तिकी यात्रा भरवण्यास सकारात्मक असल्याचा जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news