लोणावळा: पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

लोणावळा: पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
Published on
Updated on

लोणावळा : लोणावळा आणि पवना धरण भागात मागील दोन दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने यावेळी घटनास्थळी कोणी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

मागील 24 तासात लोणावळा शहरात 166 मिलिमीटर तर पवना धरण भागात 98 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुधीवरे खिंड ही लोणावळा आणि पवना धरण भागाला आपापसात जोडणारी खिंड असून पवनानगर परिसरातील सर्व गावांना लोणावळ्यात येण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग आहे.

लोणावळा भागातून मोठ्या संख्येने पर्यटक पवना धरणाचा जलाशय पाहण्यासाठी जात असतात. त्यावेळी अनेक वेळा पर्यटक या खिंडीमध्ये फोटो काढण्यासाठी थांबत असतात.

सदरची खिंड धोकादायक झाली असून कोणत्याही क्षणी खिंडीच्या डोंगराचे दगड व माती पडू शकते असे वारंवार सांगितले जात असताना देखील मावळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या सूचनांकडे कायम कानाडोळा केला. आता दरड पडल्यामुळे रस्ता काही प्रमाणात बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत सदरचे दगड व राडारोडा बाजुला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा तसेच धोकादाय दगड काढून घ्यावेत अशी मागणी याभागातील नागरिक व प्रवासी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news