

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दु:ख व्यक्त केले आहे. "कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. कोल्हापूर शहराच्या व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत." असे काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही जाधव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली! कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस पक्षाचे आमदार, उद्योजक आणि आमचे सहकारी चंद्रकांत जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत." असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉलच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.