Rain : आज आणि उद्याही राहणार पावसाचा जोर कायम! | पुढारी

Rain : आज आणि उद्याही राहणार पावसाचा जोर कायम!

मुंबई, पुढारी ऑनलाईन : लक्षद्विप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी या पट्ट्यात दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम आणि जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. त्यामुळे कांदा, आंबा, द्राक्षे या फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज (2 डिसेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. उद्या (3 डिसेंबर) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्‍येही हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्‍याचे हवामान विभागाने म्‍हटलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस (Rain) सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्यास बुधवारी सुरुवात झाली आहे. गुरुवारी हे चक्रीवादळ तीव होण्याची शक्यता आहे. शनिवारी हे वादळ आंध प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कोकण, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात किमान 17 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी 3 दिवस राहणार आहे.

Rain www.pudhari.news

एक डिसेंबर रोजी दुपारी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण थायलंड ते अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. गुरुवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. हे चक्रीवादळ आंध प्रदेशच्या किनारपट्टीवर शनिवारी सकाळी धडकण्याची शक्यता आहे.

सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला आहे. हा संपूर्ण परिसर ढगांनी वेढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. यामुळे राज्यात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आगामी चोवीस तासांत मध्यम स्वरूपाचे राहील. पुढील 48 तासांत ते अधिक तीव्र होऊन शनिवारपर्यंत देशभर पाऊस राहील. अरबी समुद्रातही वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण ते गुजरात किनारपट्टीपर्यंत ढगांची प्रचंड गर्दी झाली आहे. वार्‍यांचा वेगही वाढल्याने सर्वत्र दाट धुके व हलका पाऊस राहील.

यावर्षी अधूनमधून थंडी  

गेल्या दोन वर्षांपासून हवामानात बदल होत असल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत पाऊस हजेरी लावत आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्यामध्ये वाढ होत आहे. त्याचाही परिणाम थंडीवर होत आहे. यंदाही थंडी अधूनमधूनच राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. दरम्यान, 5 ते 23 डिसेंबरदरम्यान थंडीचा जोर चांगला राहणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून थंडीच्या मोसमात राज्यात मुसळधार पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरण आहे.

त्यामुळे थंडी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी जोर धरीत असते. मात्र, यावेळी थंडीऐवजी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अशी स्थिती राज्यात पाहावयास मिळत आहे. आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र, अजूनही राज्यात थंडी पडण्यास कोणत्याही प्रकारचे पोषक वातावरण तयार झालेले नाही.

हेही वाचलं का?

Back to top button