

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
नायजेरियातून कोल्हापुरात गेल्या आठवड्यात आलेली ५२ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. न्यू शाहुपूरीतील सुर्वे कॉलनी येथील संबंधित व्यक्ती आहे. शासनाच्या नियमावलीनुसार संबंधित व्यक्तीचा स्वॅब पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. (Kolhapur Omicron suspected)
परिणामी परदेशातून कोल्हापुरात आलेल्या दहा वर्षाच्या बालकाबरोबरच आता ही व्यक्तीही ओमायक्रॉन संशयित रूग्ण झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन संशयित बालकाच्या संपर्कातील पाचही व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.
न्यू शाहुपूरीतील संबंधित व्यक्ती नायजेरियात खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरीस आहे. ख्रिसमस सुट्टीनिमित्त ते कोल्हापूरात आले आहेत. नायजेरिया हा देश ओमायक्रॉनसाठी हाय रिस्कमध्ये नाही.
त्यामुळे तेथे कोरोना तपासणीनंतर संबंधित व्यक्ती ९ डिसेंबरला मुंबईत आली.
मुंबईतही त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यानंतर चारचाकी वाहनाने ते कोल्हापुरात आले. याठिकाणी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. स्वॅब घेतल्यानंतर त्याचा मंगळवारी रिपोर्ट आला.
व्यक्तीच्या संपर्कातील ८ जणांचे स्वॅब महापालिका प्रशासनाने घेतले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने त्याठिकाणी औषध फवारणी केली.
सबंधित व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असल्याचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.