

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : kolhapur corona : कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून तब्बल चार महिन्यांनी रुग्णसंख्येचा आलेख उतरता दिसत असला, तरी तो चकवा देणारा आहे. कारण या घसरत्या रुग्णसंख्येला चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण जबाबदार तर आहेच. शिवाय कोरोना मृत्यूंची संख्या अद्याप कमी होत नसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी प्रभावी लसीकरण आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचे नागरिकांना काटेकोर पालन करावे लागेल. अन्यथा कोरोनाचा मुक्काम गणेशोत्सवापर्यंत लांबू शकतो.
kolhapur corona कोल्हापुरातील कोरोनाची स्थिती हा जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय होता. देशातील 700 जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांतून कोरोना लाट ओसरल्याचे संकेत मिळाले, तरी कोल्हापुरात मात्र कोरोना वाढत होता आणि दैनंदिन रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या दरम्यान नोंदवित कोरोना बळींची संख्याही सरासरी 25 ते 30 च्या दरम्यान राहत असल्याने कोल्हापुरातील कोरोना हा राज्याच्या चिंतेचा विषय होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र या आकडेवारीत थोडा फरक पडला.
रुग्णसंख्या हजाराच्या खाली घसरली आणि 26 तारखेला तर ती 355 पर्यंत खाली आली. यामुळे कोल्हापुरातील कोरोना संपला असे समजून नागरिकांची जीवनशैली सैल होऊ लागली आहे. राज्यकर्त्यांच्या मेळाव्यात, पूर पाहणी दौर्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांना सोडचिठ्ठी दिली जाऊ लागली आहे. शिवाय बाजारपेठांतही लोक गर्दी करताना दिसताहेत. तथापि, ही रुग्णसंख्या चकवा देणारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनाच्या साथीचे विश्लेषण करताना रुग्णसंख्येबरोबर केलेल्या कोरोना चाचण्यांना विशेष महत्त्व असते. किती चाचण्या केल्या आणि किती बाधित रुग्ण निदर्शनास आले, यावरून साथीचे गांभीर्य निश्चित केले जाते. जून महिन्यामध्ये साथ थैमान घालत असताना उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा झाला, तेव्हा त्यांनी चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले होते. ग्रामीण भाग पिंजून काढा, असे सांगितल्यानंतर कोल्हापुरात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या. दैनंदिन चाचण्यांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली होती.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र ही संख्या कमी झाली आणि सरासरी 6 ते 7 हजार चाचण्या होऊ लागल्या. यामुळेच बाधितांचा आकडाही आपोआप खाली आला असला, तरी यावरून कोल्हापुरातील कोरोना संपला, असा कोणी अन्वयार्थ काढला, तर तो चुकीचा ठरणार आहे. साथीने मृत्युमुखी पडणार्यांची संख्या नेहमी साथीच्या गांभीर्याकडे निर्देश करीत असते.
कोल्हापुरात कोरोनाची kolhapur corona रुग्णसंख्या थोडी कमी आली असली, तरी कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण मात्र अद्याप कमी होत नाही. दररोज सरासरी 20 ते 25 जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यामध्ये 20 ते 50 या वयोगटातील तरुणांची संख्याही लक्षणीय आहे.
त्यातही कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांना होणारी लागण हा आणखी एक चिंतेचा विषय आहे.
राज्यामध्ये कोरोना लसीचा एक डोस घेणार्या संख्येत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. असे असताना कोरोनाची बाधा समजू शकते; पण मृत्यू का रोखले जात नाहीत, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. ही मृत्यू संख्याच कोरोनाच्या मुक्कामाचा मोठा पुरावा म्हणून ओळखला जातो.
शिवाय, खासगी रुग्णालयांमध्ये वा प्रयोगशाळांमध्ये केलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये बाधित होणार्या रुग्णांचे प्रमाण आजही सरासरी 25 टक्क्यांच्या जवळपास आहे.
या सर्व गोष्टी विचारात घेतल्या, तर कोरोनाचा धोका आजही कायम असून गेले 16 महिने कोरोनाबरोबर नेटाने लढताना पुराच्या संकटाशीही दोन हात करणार्या कोल्हापूरकरांना अद्यापही कसोटीला उतरावे लागणार आहे.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चाचण्या कमी
दररोज सरासरी 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू
नागरिकांच्या सैलपणाला बंधन आवश्यक
कोल्हापुरातील कोरोना स्थिती तारीख चाचण्या बाधित रुग्ण टक्केवारी
हे ही पाहा :