सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव

सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत.                                                                                                – संपादक, बहार पुरवणी

संबंधित बातम्या

कुस्तीच्या आखाड्यात सारस्वताचा गौरव

काही काही पुरस्कार एवढे मोठे असतात की, ते ज्यांना लाभतात त्यांचं व्यक्‍तिमत्त्वही आभाळाएवढं विशाल होऊन जातं. ती व्यक्‍ती धन्य धन्य होऊन जाते. परंतु; कधी कधी काही व्यक्‍तिमत्त्वंच एवढी विशाल असतात की, त्यांना गवसणी घालणं सर्वोत्तम पुरस्कारालाही शक्य होत नाही. अशा व्यक्‍तीला पुरस्कार प्रदान केल्यामुळे तो पुरस्कारच मोठा होऊन जातो! ‘ज्ञानपीठ’ हा देशातील साहित्यिकांना देण्यात येणारा एक सर्वोत्तम पुरस्कार. या पुरस्कारानं आजपर्यंत अनेक नामांकित आणि अभिजात साहित्यिकांना गौरविण्यात आलं; पण या पुरस्काराचाच गौरव झाला तो हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांना प्रदान करण्यात आल्यामुळे, असं म्हटलं तर ते अतिशयोक्‍तीचं मुळीच होणार नाही.

1975 चा ज्ञानपीठ पुरस्कार भाऊसाहेबांना जाहीर झाल्यानंतर सार्‍या महाराष्ट्राला आनंद झाला; पण खर्‍या अर्थानं आनंदात न्हाऊन निघालं ते कोल्हापूर! कारण, या महाराष्ट्र शारदेच्या सुपुत्राची नाळ खर्‍या अर्थानं कोल्हापूरच्या मातीशीच जुळली गेली होती. भाऊसाहेब खांडेकर म्हणजे कोल्हापूरच्या साहित्य परंपरेचा मानबिंदू!

‘प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसर्‍याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःच्या जखमांनी!’
किंवा ‘आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही’…
हे जीवनातील सत्य सांगणारा हा महान लेखक.
‘पुस्तकातील सार्‍या खुणा पुस्तकातच राहतात; पण ज्यातल्या खुणा आपण कधीही विसरत नाही, असा एकच ग्रंथ आहे आणि तो म्हणजे जीवन!’

हे शाश्‍वत सत्य मांडणारा एक ऋषितुल्य सारस्वत!
मी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना काही मित्रांच्या नोटबुकवर तरुणांच्या काळजाला हात घालणारं खांडेकरांचं एक वाक्य लिहिलेलं पाहायला मिळायचं.
‘प्रेम हा सौदा नाही, तर ते एक वरदान आहे. प्रकाशासारखं, पावसासारखं!’
मनाच्या गाभार्‍यात उतरणारा असा हा प्रतिभावंत साहित्यिक.

या देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कारानं खांडेकरांचा यथोचित गौरव करण्यात आला. ‘ज्ञानपीठ’च्या निवड समितीनं 28 सप्टेंबर 1975 रोजी हा पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या एकूणच साहित्यसेवेची दखल घेऊन आणि ‘ययाति’ या त्यांच्या कादंबरीला केंद्रबिंदू ठरवून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. 1959 साली प्रसिद्ध झालेली ‘ययाति’ ही कादंबरी भाऊसाहेबांची सर्वश्रेष्ठ वाङ्मयनिर्मिती मानली जाते. याशिवाय ‘सुखाचा शोध’, ‘रिकामा देव्हारा’, ‘सांजवात’, ‘स्वप्न आणि सत्य’, ‘फुले आणि दगड’, ‘नवी स्त्री’ तसेच ‘अमृतवेल’ यांसारखं विपुल लेखन करून त्यांनी काही पिढ्या घडविण्याचं पवित्र काम केलेलं आहे. त्यांचं लिखाण म्हणजे विविध विचार आणि सुविचारांची वाचकांसाठी एक मेजवानीच असायची.

‘माणूस मोठा विचित्र आहे. सुख घटा घटा पितो आणि दुःख चघळत बसतो’…
मानवी जीवनाचा स्थायीभाव याहून अधिक समर्पकपणे कुठल्या दुसर्‍या लेखकानं वेगळ्या शब्दांत मांडला असता?

पुरस्कार प्रदान

26 फेब्रुवारी 1976 रोजी ख्यातनाम हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांच्या हस्ते भाऊसाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खरं तर हा दुग्धशर्करा योगच म्हटला पाहिजे. ज्ञानेश्‍वरांचा सत्कार मुक्‍ताबाईंनी करणे जेवढं यथार्थ, तेवढंच भाऊसाहेबांचा गौरव महादेवींनी करणंही यथार्थच होतं. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पायांना चंद्रभागेनं अभिषेक घालावा, तसाच हा हृद्य सोहळा होता!

या सोहळ्याला भाऊसाहेबांचे लेखनिक आणि बालवाङ्मयकार रा. वा. शेवडे गुरुजी यांच्यासह मीही जातीनं उपस्थित होतो. तो अविस्मरणीय सोहळा आजही जसाच्या तसा माझ्या मन:चक्षूंसमोर उभा आहे. हा सत्कार केवळ वि. स. खांडेकर नावाच्या एका साहित्यिकाचा नव्हता, तर तो मराठी मातीचा होता. मराठी मायबोलीचा होता आणि कोल्हापूरच्या ज्या तांबड्या मातीतील कुस्ती जगभर गाजली, त्याच मातीचा साहित्य शारदेनं भरलेला हा मळवट होता. या दैवदुर्लभ प्रसंगाला उपस्थित राहण्याची संधी मला लाभली, हे मी माझं भाग्य समजतो.

ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला माझ्याबरोबरच ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंदराव तळवलकरही उपस्थित होते. तेव्हा तळवलकरांनी मला प्रश्‍न केला.

“काय हो बाळासाहेब? कोल्हापुरात भाऊसाहेब खांडेकरांचा सत्कार होईल का?”
“का नाही होणार?” मी प्रतिप्रश्‍न केला.
“कोल्हापूर हा बहुजन समाजाचा बालेकिल्ला आहे, म्हणून म्हटलं!” तळवलकर उद‍्गारले.
“गोविंदराव”, मी ताडकन म्हणालो, “कोल्हापूर जातपात न मानणारं शहर आहे. तिथं समतेचं शिक्षण दिलं जातं. जातिभेदाचं नाही!”
यावर तळवलकर फक्‍त हसले आणि त्यांंनी तो विषय बदलला; पण माझ्या मनात मात्र तो विषय खोल रुतूनच बसला.
‘ऐकणार्‍याचे दोन वर्ग असतात. एक कानाने ऐकणारा आणि दुसरा काळजाने ऐकणारा.’
भाऊसाहेबांची ही उक्‍ती मला त्यावेळी प्रकर्षानं आठवली. तळवलकरांचं कोल्हापूरविषयीचं मत हे कानांनी ऐकणार्‍यांपैकीच होतं, याची मला जाणीव झाली आणि थोडंसं वाईटही वाटलं.

आणि त्याचवेळी मी मनाशी ठाम निर्णय घेतला की, केवळ गोविंदरावांचीच नव्हे तर कोल्हापूरकडे जातीयवादी द‍ृष्टीनं पाहणार्‍या सर्वांचीच बोलती बंद करायची! कोल्हापुरात भाऊसाहेबांचा भव्य नागरी सत्कार घ्यायचा संकल्प त्याच क्षणी मी माझ्या मनाशी सोडला! कारण –
“मन ओळखणार्‍यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपणूक आयुष्यभरासाठी.”
भाऊसाहेबांची ही विचारसुमनं मी कधीही विसरलो नव्हतो. त्यांचा सुगंध सदैव माझ्या मनात दरवळत राहिला होता!

सत्काराचा संकल्प

मी कोल्हापुरात आलो. प्रथमतः या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे लक्षात घेतले आणि सर्वप्रथम कोल्हापूर महापालिकेकडे सत्कार घेता येईल का, याची चाचपणी केली. तसेच जिल्हा परिषदेलाही विचारलं. मात्र, तेव्हा आणीबाणी सुरू होती. त्यामुळे इच्छा असूनही दोन्ही संस्थांनी नकार दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नकार मिळाला, तरी उमेद हरणार्‍यांपैकी मी नव्हतो. आपणच पुढाकार घेऊन सोहळा घडवून आणायचाच, असा मी निश्‍चय केला. जेव्हा जेव्हा संकटं समोर उभी राहतात, तेव्हा तेव्हा माझ्या प्रयत्नांना अधिक धार चढते, असा माझा अनुभव आहे. मी लगेचच शेवडे गुरुजींना घेऊन भाऊसाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना सोहळ्याची कल्पना देऊन त्यांची संमती मिळवली.

मग मी ‘पुढारी’च्या कार्यालयात एक व्यापक बैठक बोलावली. या बैठकीला कोल्हापुरातील सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यापूर्वी शिवराज्याभिषेक त्रिशत्संवत्सरी आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मशताब्दी हे दोन्ही सोहळे मी शानदारपणे पार पाडले होते. त्यामुळे असे सोहळे संपन्‍न करण्याचा माझ्याकडे बहुमूल्य अनुभव होता, हे सर्वांनाच ज्ञात होते.

मी खांडेकरांच्या सत्काराचा प्रस्ताव मांडला मात्र, कोल्हापुरातील सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांनी त्याला दांडगा प्रतिसाद दिला. याच बैठकीत या कार्यक्रमासाठी माझ्याच अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक समिती स्थापन करण्यात आली. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांची निवड झाली. मग सत्काराचे ठिकाण कोणते असावे, यावरही सविस्तर चर्चा झाली.
कुणी म्हणाले, “केशवराव भोसले नाट्यगृहात समारंभ घेणं सोयीस्कर होईल.”
तर कुणी म्हणालं, “प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात कार्यक्रम घ्यावा.”

कुणी काय, तर कुणी काय सुचवीत होतं. मी तोपर्यंत माझं मत गुलदस्त्यातच ठेवलं होतं. भाऊसाहेबांचा नागरी सत्कार व्हावा, असं सर्वांनाच मनापासून वाटत होतं; पण कुणालाच त्याचं स्वरूप भव्य-दिव्य असावं, याची नीटशी कल्पना येत नव्हती. सगळ्यात शेवटी मी माझा पत्ता उघडला.

“मला हा सत्कार शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानात घ्यायचा आहे!” मी उद‍्गारलो.

मी हे सांगितल्यावर सगळेच हबकले. सर्वांची शंका एकच होती, शाहू खासबाग मैदान भरण्याइतके प्रेक्षक येतील का? पण लोक येणार याचा मला ठाम विश्‍वास होता. मी सर्वांनाच त्याचा विश्‍वास दिला आणि हेच ठिकाण निश्‍चित केलं. मग आम्ही झपाट्यानं कामाला लागलो. शाहू खासबाग मैदान निवडण्यामागेही माझ्या मनात एक विशिष्ट उद्देश होता. कोल्हापूरकरांनी अटकेपार जे झेंडे रोवले होते, ते खासबाग मैदानाला साक्षी ठेवूनच. त्याच ठिकाणी साहित्याच्या क्षेत्रात अटकेपार झेंडा रोवणार्‍या एका ज्येष्ठ साहित्यिकाचा सत्कार झाला, तर कोल्हापूरकरांच्या लौकिकाला चार चाँद लागणार होते, यात शंकाच नव्हती!

संयोजन आणि नियोजन

समारंभासाठी प्रमुख पाहुणे कोण असावेत, याबाबतीतही खूप चर्चा झाली. त्यातून काही ज्येष्ठ साहित्यिक, तर काही राजकारणी मंडळींची नावं पुढे आली; पण मी त्याबाबतही मनात काही योजना आखली होती. ‘करायचं तर दणक्यात’ ही माझी प्रवृत्ती होती. त्याप्रमाणे मी सर्वांना म्हणालो,
“माझ्या डोक्यात राजकारणातले साहित्यिक आहेत!”
“कोण?” न कळून प्रश्‍न आला.
“अर्थातच, यशवंतराव चव्हाणसाहेब!”
“काऽय?” सारेच अचंबित.
“होय!” मी उत्तरलो, “आणि अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना बोलवावं, असं मला वाटतं!”

सर्वांनाच ही कल्पना सुखावह वाटली. परंतु; आणीबाणीचा काळ असल्यामुळे ते या कार्यक्रमाला येतील का, अशी शंका सर्वांनीच उपस्थित केली. पण मी सर्वांना आश्‍वस्त करीत म्हणालो,
“अध्यक्ष या नात्यानं या दोन्ही पाहुण्यांना आणण्याची जबाबदारी माझी! तुम्ही मुळीच चिंता करू नका!”
मग मात्र सर्वांचं एकमत झालं.

‘यशवंतराव चव्हाण हे हाडाचे साहित्यप्रेमी आणि साहित्यिकही. त्यांनीही खांडेकरांचं साहित्य वाचलेलं. समाजातील वंचित, गोरगरीब घटकांच्या दुःखाला वाचा फोडून त्यांच्या शब्दांना अलंकाराची जोड देण्याची किमया करणारा किमयागार म्हणजे भाऊसाहेब खांडेकर! साहजिकच खांडेकरी साहित्याचा पुरेपूर अभ्यास असलेल्या यशवंतरावांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा मी निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असावेत, असं मला मनापासून वाटत होतं.’

मी लगेचच यशवंतरावांना फोन करून भाऊसाहेबांच्या सत्काराची कल्पना दिली आणि म्हणालो,
“मी स्वतः या सत्कार सोहळ्याचे आयोजन केलं आहे! आपण आलंच पाहिजे.”

यशवंतरावांनी कोणतीही हरकत न घेता लगेच होकार दिला. मात्र, माझा जीव भांड्यात पडतो न पडतो, तोच दुसर्‍या दिवशी त्यांचे पी. ए. डोंगरे यांचा मला फोन आला. त्यांनी मला “साहेब आणीबाणी असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत,” असा निरोप दिला. मी हबकलोच. पण, स्वतःला सावरले व हा निरोप इतर समिती सदस्यांना न सांगता मी माझ्या मनात निश्‍चय केला आणि मी थोड्या वेळाने चव्हाण साहेबांना फोन केला. त्यानंतर साहेब माझ्याशी बोलले. ते म्हणाले, “माफ करा बाळासाहेब; पण सध्या आणीबाणी आहे. गेल्या वर्षी दुर्गाबाई भागवतांनी कराडच्या साहित्य संमेलनात माझ्या समक्षच आणीबाणीवर टीका केली. आता खांडेकरही असं काही बोलले तर मी अडचणीत येईन. मंत्री म्हणून मला तेवढी खबरदारी घेतलीच पाहिजे.”

“समजा, साहेब…!” मी म्हणालो, “आणीबाणीवर काहीही बोलणार नाही, असा जर मी खांडेकरांचा शब्द घेतला, तर याल का?”
“तसं झालं तर मग माझी हरकत नाही,” चव्हाणसाहेब उत्तरले.
त्यानंतर मी शरद पवारांनाही फोन केला. मात्र पवारही म्हणाले, “अडचण होईल.”
परंतु चव्हाणसाहेबांचा होकार मिळाल्यावर मी राजारामपुरीतील भाऊसाहेबांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हणालो,
“आपल्या सत्काराचा कार्यक्रम घेतो आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांना निमंत्रण दिलं आहे. मात्र, सत्कार सोहळ्यात आपण आणीबाणीवर काही बोललात तर त्यांची अडचण हाईल, असं त्यांना वाटतं.”
भाऊसाहेबांनी शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते तितक्याच शांतपणे बोलू लागले,

“बाळासाहेब, कोल्हापुरात माझा सत्कार होत आहे. हा माझ्या द‍ृष्टीने मोठा आनंदाचा क्षण आहे. अहो, माझी पत्नी वारली, तेव्हा अंत्ययात्रेला फारसं कुणी आलं नाही. अखेर शववाहिकेतून पार्थिव अंत्यविधीसाठी नेलं. मी आणीबाणीच्या विरोधातच आहे; पण सत्कार सोहळ्यात मी आणीबाणीसंबंधी काहीही बोलणार नाही. हा माझा शब्द आहे आणि मुळात हा योग जुळून येत आहे. तो सत्यशोधक मुशीतून तयार

झालेल्या ‘पुढारी’मुळेच. याचं भानही मला ठेवावंच लागेल! आपण पुढाकार घेतला नसता, तर हे शक्य तरी झालं असतं का?”
‘- झाडाची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या माणसांचा आधार शोधतात.’
हा त्यांचाच विचार मला शब्द देऊन भाऊसाहेबांनी खरा केला आणि त्यांच्याविषयीचा माझ्या मनातील आदर अधिकच दुणावला. मी लगेचच यशवंतरावांना फोन केला आणि भाऊसाहेबांशी झालेला संवाद त्यांच्या कानावर घातला. त्यावर ते म्हणाले,
“साहित्यिक मंडळींचं काही सांगता येत नाही. ते एकदा बोलायला लागले की, त्यांना थांबवताही येत नाही. तुम्ही जबाबदारी घेत असाल तरच मी येतो.”

“भाऊसाहेब आणीबाणीविरुद्ध काही बोलणार नाहीत ही माझी जबाबदारी!” असं मी ठामपणे सांगितल्यावर मग मात्र चव्हाणसाहेब सत्कार सोहळ्याला यायला तयार झाले.
परंतु त्यानंतरही मला शरद पवारांचा फोन आला.
“बाळासाहेब, खांडेकरांच्या कार्यक्रमाला साहेबांना बोलावून त्यांची अडचण करू नका!” ते म्हणाले.
“शरदराव!…” मी त्यांना आश्‍वस्त करीत म्हणालो, “भाऊसाहेब आणीबाणीवर एक चकार शब्दही बोलणार नाहीत, याची खात्री बाळगा!”

24 एप्रिल1976 : सत्काराचा दिवस

पहिला प्रश्‍न सुटला होता; पण आता हा दुसरा प्रश्‍न होता. यशवंतराव आणि शंकरराव या दोन चव्हाणांतही फारसं काही सख्य नव्हतं. ते दोघेही एका व्यासपीठावर सहसा कधी येत नसत. पण माझे दोघांशीही चांगले संबंध होते. केवळ माझा शब्द म्हणून या कार्यक्रमासाठी दोघांनी एका व्यासपीठावर येण्याचं मान्य केलं. जणू चव्हाण त/ी चव्हाण अशी जुगलबंदीच यानिमित्तानं एकाच व्यासपीठावर रंगणार होती आणि थोडासा अहंभावाचा दोष पत्करूनही मी असे म्हणू शकतो की, ही किमया फक्‍त मीच करू शकलो!

पडद्याआड या घडामोडी चालू असतानाच सत्काराची जय्यत तयारी चालू होती आणि मग बघता बघता 24 एप्रिल 1976 हा सत्काराचा दिवस उजाडला. साहित्य क्षेत्रात तळपणार्‍या एका चमचमत्या तार्‍याला जणू मानवंदना देण्यासाठीच आजचा सूर्य उगवला होता. अनंत हस्ते तो नारायण सुवर्णफुलं उधळीत होता.

मी सत्कार समारंभाची जय्यत तयारी केली होती. सायंकाळी सात वाजता हा भव्य-दिव्य कार्यक्रम होणार होता; पण त्यापूर्वीच मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अर्थातच, तो सर्व भाऊसाहेबांचा वाचक वर्ग होता. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारा रसिक होता. भाऊसाहेबांचं साहित्य त्यांच्या मनामनांत विराजमान झालं होतं. त्या अभिजात साहित्यानं त्यांच्या मनाचा ठाव घेतलेला होता. त्यामुळेच आज आपल्या साहित्यिकाचा गौरव करण्यासाठी, त्यांचा होणारा गुणगौरव ऐकण्यासाठी तो प्रचंड जनसमुदाय आज खासबागेत जमला होता. तो प्रचंड जनसमुदाय द‍ृष्टीला पडल्यानंतर ‘खासबाग मैदान भरण्याइतकी माणसं येतील का’ या माझ्या सहकार्‍यांना पडलेल्या प्रश्‍नाचं उत्तर आज त्यांना मिळालं होतं. आणि ही केवळ माणसं नव्हती, तर वेचक रसिक प्रेक्षक होते, हे विशेष!

या कार्यक्रमाला मी केवळ यशवंतराव चव्हाण व शंकरराव चव्हाण यांनाच बोलावलं होतं असं नाही, तर मी महाराष्ट्राच्या सगळ्या मंत्रिमंडळाला निमंत्रित केलं होतं. त्यामुळे शरदराव पवार व इतर सर्व मंत्री आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होेते. एवढेच नव्हे तर साहित्यिक रणजित देसाईंच्या बरोबरच महाराष्ट्रातील व बाहेरील सर्व साहित्यिकांची मांदियाळीच या समारंभाला उपस्थित होती. हा कार्यक्रम म्हणजे राजकीय, साहित्यिक, रसिक यांचं एक अनोखं असं साहित्य संमेलनच होतं असंच म्हणावं लागेल.

माझी शब्दांजली

मी सत्कार समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे अध्यक्ष या नात्यानं प्रास्ताविक मलाच करायचं होतं. व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोरचा अफाट जनसागर यांना साक्षी ठेवून माझी पहिली शब्दांजली अर्पण करायला उभा राहिलो.

“आज राजर्षी शाहू महाराज असते, तर त्यांनी भाऊसाहेेबांची सोन्याचं कडं घालून हत्तीवरून अंबारीतून मिरवणूक काढली असती!”
या माझ्या उद‍्गारावर टाळ्यांचा महापूर उसळला! भाऊसाहेबांच्या समग्र साहित्याचा थोडक्यात आढावा घेतानाच, ते जितके साहित्यिक म्हणून महान आहेत, तितकेच ते माणूस म्हणूनही कसे ‘ग्रेट’ आहेत, याचं मी विवेचन केलं. तसेच भाऊसाहेबांच्या साहित्याची मीमांसा करतानाच ते सर्वसामान्यांच्या जीवनाशी कसे निगडित आहे, हे त्यांच्या पुस्तकातील दाखले देऊनच मी सांगितले. ज्या कादंबरीसाठी त्यांना ‘ज्ञानपीठ’ मिळालं त्या ‘ययाति’मधलं एक वचन मी उद‍्धृत केलं.

‘या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे, तसं मरणाचं नाही. मृत्यू अनेक वाटांनी येतो! कुठूनही येतो तो!’
त्याच कादंबरीतलं मी आणखी एक वचन सांगितलं,
‘दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात विलक्षण आनंद होत असतो.’
किंवा ‘त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही, ते रणांगण आहे.’

असे त्यांच्या साहित्यातील अनेक दाखले मी देत असताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांना दाद दिली. एकंदरीतच खांडेकरांच्या साहित्याच्या मी केलेल्या मीमांसेचं रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा पाऊस पाडूनच स्वागत केलं आणि प्रास्ताविकालाच सभा रंगली!

शिष्याची गुरुवंदना

माझ्यानंतर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई बोलायला उभे राहिले. ते तर भाऊसाहेबांना गुरू मानायचे. रणजित देसाईंचं भाषण म्हणजे शिष्याकडून गुरूची केलेली शब्दपूजाच! जणू अर्जुनानं द्रोणाचार्यांची मानसपूजा करावी किंवा ज्ञानेश्‍वरांनी निवृत्तिनाथांची भावपूजा बांधावी, तद्वतच रणजित देसाई यांनी भाऊसाहेबांची आज शब्दपूजा बांधली होती!

ते म्हणाले, “भाऊंना मी गुरू मानतो. कोल्हापूर हे सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. याच कोल्हापुरात भाऊंनी लावलेल्या साहित्यातील वृक्षाचं आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालं आहे. भाऊंचं कर्तृत्व अजोड आहे; पण त्यांना वटवृक्षाची उपमा योग्य वाटत नाही. कारण, त्याच्या छायेत इतर वृक्ष वाढत नाहीत; पण भाऊंनी माझ्यासारख्या अनेकांना हाताशी घेऊन त्यांना मोठं केलं. त्यांना चंदनाची उपमाही छोटी ठरेल.”

रणजित देसाईंनंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकाच वाक्यात आपल्या भावना व्यक्‍त केल्या. ते म्हणाले, “मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्यानं, साहित्याच्या क्षेत्रात अटकेपार झेंडा लावणार्‍या वि. स. खांडेकर नावाच्या योद्ध्याला मानाचा मुजरा करायला आलो आहे!”

आणि मग शंकररावांनंतर यशवंतराव चव्हाण बोलायला उभे राहिले. चव्हाणसाहेब हे फर्डे वक्‍ते. प्रतिभावंत साहित्यिक, कुशल राजकारणी. एक अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व. ते बोलायला उभे राहताच खचाखच भरलेल्या खासबाग मैदानावर टाचणी पडली तरी तिचाही आवाज झाला असता, एवढी शांतता पसरली. प्रेक्षक चव्हाणसाहेबांचे बोल ऐकण्यासाठी कान टवकारून बसले होते.

“मी आज या ठिकाणी कृतज्ञतेचं भाषण करायला उभा आहे…” यशवंतराव चव्हाणसाहेब बोलू लागले, “ज्यांनी आमच्यावर काही संस्कार केले, आम्हाला विचार दिले आणि मराठी भाषेची थोर सेवा केली, अशा एका थोर विचारवंतासंबंधीची कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी मी आलो आहे. आज हा समारंभ पाहून मराठी माणसांबद्दल आणि मराठी भाषेबद्दलचा अभिमान अगदी उंचावून जातो.”

ते पुढे म्हणाले, “मराठी माणूस ज्या खुशीनं आणि हौसेनं ज्या खासबाग मैदानात कुस्ती बघतो, त्याच खासबाग मैदानामध्ये चांदण्यांच्या आणि फुलांच्या कथा सांगणार्‍या भाऊसाहेब खांडेकरांचा हा मान-सन्मानाचा समारंभ आज आपण अक्षरशः हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन साजरा करीत आहोत, हे कुणालाही आनंद देणारे असे चित्र आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना मी सांगेन की, तुम्ही तुमच्या लेखणीद्वारे आणि मराठी माऊलीच्याद्वारे जी ज्ञानाची आणि सरस्वतीची सेवा करीत आहात, तिची पोचपावती तुम्हा सर्वांना आज खासबाग मैदानावर जनतेनं या सोहळ्याच्या रूपानं दिली आहे. या अर्थानं हा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आहे.”

आणि मग आवर्जून माझा उल्‍लेख करून ते म्हणाले, “हा समारंभ घडवून आणल्याबद्दल ‘पुढारी’कार बाळासाहेब जाधव यांच्या कल्पकतेबद्दल त्यांचे जाहीर कौतुक करतो.”

टाळ्यांच्या कडकडाटात यशवंतराव पुढे बोलू लागले, “भाऊसाहेबांच्या शब्दचमत्कृती, त्यांच्या कल्पनाचमत्कृती यांच्यामुळे त्यांचं लिहिणं मला आकर्षित करीत होतं. भाऊसाहेबांच्या कथा-कादंबरीतील नायकाला आठवण झाली, म्हणजे ती वार्‍याच्या झुळकीसारखी आल्हाददायक असायची. भाऊसाहेबांच्या नायिकेला भीती वाटली, तर ती भीती म्हणजे संध्याकाळच्यावेळी अंधारामध्ये जसं काही वळवळलं म्हणजे वाटतं, तशी ती भीती असायची.”

“भाऊसाहेबांच्या नायकानं एखाद्या तरुणीच्या उजव्या गालावरची खळी पाहिली, म्हणजे आपण लहान असताना तळ्यात खडा मारल्यानंतर जे पाण्यात भोवरे फिरत फिरत जातात, त्यांची त्याला आठवण व्हायची. भाऊसाहेबांचं वाङ्मय वाचायला घेतलं, म्हणजे बीजेची कोर त्यात डोकावली नाही किंवा चवथीचं चांदणं पडलं नाही, असं कधी झालंच नाही.”

“भाऊसाहेबांच्या वाङ्मयात निदान मी तरी कधी अमावास्या पाहिली नाही. बीजेची कोर असेल किंवा चवथीचा चांद असेल किंवा अष्टमीचा चंद्रमा असेल किंवा पुनवेचा चंद्र असेल. असा हा चांदण्यांचा लेखक आहे. प्रकाशाचा लेखक आहे. सहृदय लेखक आहे; पण नुसता सहृदय लेखक नाही, तर भाऊसाहेबांच्या लिखाणामध्ये स्वप्नाळू सहृदयतेबरोबरच निर्धारित क्रियाशीलताही आहे. नोबेल पुरस्काराच्या तोडीचं त्यांचं साहित्य आहे.”

आज जणू यशवंतरावांच्या रसवंतीला प्रतिभेचा पान्हाच फुटला होता. मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांपुढे आपल्या भावना व्यक्‍त करताना ते पुढे म्हणाले,

“ज्याला माणसाच्या जीवनातील सुख-दुःखं आणि त्यामागच्या प्रेरणा तसेच त्याच्या यातना-वेदना समजत नाहीत, तो लेखक कदाचित पांढर्‍यावर काळं करू शकतो; पण शेकडो वर्षे टिकून राहील, असं जिवंत वाङ्मय निर्माण करू शकणार नाही. मराठी साहित्य क्षेत्रात आजतागायत पुष्कळ वाद झाले. कलेकरिता कला की, जीवनाकरिता कला, अशा तर्‍हेचा वादही मधल्या काळात निर्माण झाला होता. परंतु भाऊसाहेब खांडेकर हा असा एक माणूस आहे की, ज्यानं आग्रहानं सांगितलं की, ‘तुम्ही नुसत्या काल्पनिक आनंदाच्या गोष्टी बोलून भागणार नाही. तुमच्या लेखनाला जर काही विचारप्रेरक असा द‍ृष्टिकोन नसेल, जर काही सामाजिक आशय नसेल, तर तुमचं लेखन हे खरं साहित्य होऊ शकणार नाही.”

मग किंचित हळवे होत, हळव्या मनाचे यशवंतराव भाऊसाहेबांना म्हणाले,
“भाऊसाहेब, आपण वयामुळे शरीरानं दुबळे झाला आहात, आपल्याला दिसत नाही; पण तुम्हाला दिसत नाही, असं कोण म्हणेल? तुमच्या शारीरिक डोळ्यांना आज कदाचित दिसत नसेल; पण जे अनेकांना दिसलं नाही, ते कित्येक वर्षांपूर्वीपासून तुम्ही आम्हाला सांगितलं, हे तुमचं आमच्यावरचं ऋण आहे. तुमचे शारीरिक डोळे पाहू शकत नसतील; पण तुमची प्रतिभा कदाचित आता आणखी दूरचं पाहू शकेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.”

बाळासाहेब, हे तुमच्यामुळेच साधले

साहित्य संमेलनाच्या एखाद्या अध्यक्षालाही लाजवेल, असे अभ्यासू, विश्‍लेषणात्मक सुंदर भाषण यशवंतरावांनी केलं. माझ्याही कल्पकतेला त्यांनी मनापासून दाद दिली. भाऊसाहेबांच्या साहित्याबद्दल यशवंतरावांनी बोलण्याचा हा दुर्मीळ योग आज जुळून आला होता. त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त तर केल्याच. परंतु ‘बाळासाहेब, हे तुमच्यामुळेच साधलं’, असं मला आवर्जून सांगितलंही.

“आणीबाणी असतानाही माझ्या आवडत्या साहित्यिकाबद्दल तुम्ही मला बोलतं केलंत, ही गोष्ट मी जन्मभर विसरणार नाही”, या शब्दात त्यांनी ऋणनिर्देश केला.

ऋषितुल्य साहित्यिकाचे मनोगत

सर्वात शेवटी भाऊसाहेबांनी भावपूर्ण शब्दांत आपले मनोगत व्यक्‍त केलं. भरल्या गळ्यानं कृतज्ञता व्यक्‍त करताना ते म्हणाले, “सामाजिक परिवर्तनाचा लढा हा आपला स्वतःविरुद्धचा लढा आहे, ही गोष्ट आपण अजूनही मनावर घेत नाही. या सामाजिक परिवर्तनाबरोबरच जनतेत मानसिक परिवर्तन होणे आवश्यक आहे; पण आपण अजूनही जुन्या परंपरांना आणि रूढींना चिकटून आहोत, हे विचार जर आपल्या मनातून काढून टाकले नाहीत, तर गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी कधीच मिटणार नाही.”

या भावोत्कट उद‍्गारानंतर ते पुढे म्हणाले, “मी या सत्कारप्रसंगी एक आठवण करून देतो की, पंचगंगेला आलेला पाण्याचा पूर मी कित्येकवेळा बघितला आहे. पण कोल्हापूरच्या लोकगंगेला आलेला हा पूर मी पहिल्यांदाच अनुभवत आहे,” असे उद‍्गार काढून त्यांनी त्यांच्या पहिल्याच वाक्यात सर्व खासबाग मैदान डोक्यावर घेतलं. ते पुढं म्हणाले, “मी कोल्हापूरच्या जनतेचं प्रेम अनेकवेळा अनुभवलं आहे; पण आज एक नवा अनुभव घेत आहे. तो म्हणजे, म्हातारपणी दुसरं बाळंतपण. ही बाई त्या बाईकडे, ती बाई दुसरीकडे मूल देत असताना आणि त्याचे मुके घेत असताना त्या मुलाला जीव नकोसा होत असतो. तसा हा सत्कार आहे.”

भाऊसाहेबांच्या या उद‍्गारावर मैदानात टाळ्यांचा गजर झाला.
“मी अनेकांना पोवाडे शिकवले; पण मी स्वतः केव्हा तरी पोवाड्याचा विषय होईन, असं मला वाटलं नव्हतं” असं सांगून त्यांनी उपस्थितांची मनंही जिंकली.

त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल ते म्हणाले, “या पारितोषिकाकडे मी एका द‍ृष्टीनं पाहतो. हे पारितोषिक माझ्या मराठीला मिळाले आहे. मी मात्र त्याला कारणीभूत झालो.”

त्यांच्या मनाचं हे उमदेपण उपस्थितांचं मन हेलावून गेलं. त्यांच्या ‘ययाति’ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असला तरी आपल्या आवडत्या कादंबरीविषयी सांगताना ते म्हणाले, “खरं सांगायचं झालं तर ‘ययाति’ ही माझी सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे, हे मलासुद्धा वाटत नाही; पण प्रत्येकाची आवड वेगळी आहे. मला स्वतःला काही लिहीत असल्याचा साक्षात्कार झाला तो ‘उल्का’ कादंबरीच्यावेळी आणि ती कादंबरी मला आवडली.”

गरीब-श्रीमंतांमध्ये असलेली दरी अजूनही तशीच आहे हे सांगताना ते म्हणाले,
“दोन ध्रुव कादंबरीत मी गरिबी आणि श्रीमंतीचं जे चित्रण केलेलं आहे, ते प्रत्यक्ष पाहिलेलं. आज त्याला खूप वर्षे झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळूनही पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आज आपण कुठे उभे आहोत, हा प्रश्‍न जर विचारला, तर माझ्या समजुतीप्रमाणे जिथं होतो तिथं, असं उत्तर मिळेल!”

माणुसकीबद्दल कानपिचक्या देताना ते म्हणाले, “व्यासपीठावरून भाषण करून वा कादंबरीत लिखाण करून माणुसकी येत नाही, तर ती आचरणात आणायला शिकलं पाहिजे. आपण कोणाला मदत केली काय? आपण कोणाचे अश्रू पुसले काय? या साध्या माणुसकीच्या गोष्टी आहेत; पण त्या आपल्या हातून घडत नाहीत. यासाठी काळजाचा संवेदनशील तुकडा जागा केला पाहिजे. साहित्यिक जेव्हा फिरत असतो तेव्हा जर त्याला भावना हेलावणारं द‍ृश्य दिसलं, तर त्याचं हृदय बेचैन होतं, तो सुन्‍न होतो आणि त्यातून वैचारिक, ललित वाङ्मय जन्म घेतं.”

उपस्थित जनसमुदाय भाऊसाहेबांचे विचार मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. त्यांच्यासाठी ही एक दुर्मीळ पर्वणी होती आणि सुरेख मेजवानीही होती. त्यांचे विचार ऐकून श्रोते हेलावून गेले होते. भाऊसाहेबांच्या पत्नीच्या अंत्यविधीला नाममात्र लोक उपस्थित होते, याचं त्यांना अतीव दुःख होतं. मात्र, त्यांच्या सत्कार समारंभाला जमलेला विशाल जनसमुदाय पाहून त्यांना कृतकृत्य वाटत होतं.

मी या कार्यक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा करताना ते भारावून जाऊन म्हणाले, “बाळासाहेबांचे कौतुक वाटते! खरा आनंद तर दुसर्‍याच्या सुखात सुख मानण्यात आहे. स्वतःच्या सुखात तर सगळेच आनंदी असतात.”

खांडेकरांनी हृदयाच्या गाभार्‍यातून काढलेल्या या शब्दांनी मीही भारावून गेलो. ते शब्द आताही माझ्या कानात जसेच्या तसे गुंजारव करीत आहेत!

यशवंतराव, शंकरराव आणि इतर प्रमुख पाहुण्यांना मी माझ्या शुक्रवार पेठेतील घरात जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी यशवंतरावांनी आबांजवळ माझ्या भाषणाचं आणि नियोजनाचं तोंड भरून कौतुक केलं! यातच सारं काही आलं!

वा गुरूऽ! मानलं तुम्हाला!

“वा गुरूऽऽ! मानलं तुम्हाला! कोल्हापूर केवळ बहुजनांचा बालेकिल्लाच नाही, तर समतावादी आहे, हे तर तुम्ही दाखवून दिलंच; पण भाऊसाहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं संपूर्ण मराठी साहित्यविश्‍वाचाच तुम्ही गौरव केलात! मी फक्‍त विचारलं होतं; पण एवढा भव्य कार्यक्रम करून तुम्ही मलाही निरुत्तर केलंत! शब्दाला मान कसा द्यायचा, हे तर आपल्याकडूनच शिकावं! अभिनंदन..!”

गोविंदराव तळवलकर फोनवरून भरभरून बोलत होते. त्यांना अशक्य वाटणारी गोष्ट मी शक्य करून दाखविली होती आणि कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला होता आणि त्याचबरोबर राजर्षी शाहूरायांचं कोल्हापूर हे जातीयवादी कधीच नव्हतं; तर याउलट या कोल्हापुरातूनच सामाजिक समतेची द्वाही देशभर फिरवली गेली, हे सप्रमाण दाखवून दिलं.

भाऊसाहेबांनीही त्यानंतर मला घरी जेवायला बोलावून माझ्याविषयीची कृतज्ञता व्यक्‍त केली.

“कोल्हापुरात माझा सत्कार होईल, असं कधीच मला वाटलं नव्हतं; पण बाळासाहेब, तुमच्यामुळेच हे घडून आलं!” ते सद‍्गदित कंठानं म्हणाले.

कृतज्ञता व्यक्‍त करतानाच, त्यांनी लिहिलेली शेवटची ‘घर’ नावाची कथा ‘पुढारी’च्या दिवाळी अंकासाठी दिली. कोल्हापूरकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असा हा देदीप्यमान सोहळा झाला. या सोहळ्यानं भाऊसाहेब कृतकृत्य झाले. त्यांनी शेवडे गुरुजींकडे तसं बोलूनही दाखवलं. जणू –

याचसाठी केला होता अट्टाहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥

तुकारामांची मानसिक अवस्था आणि भाऊसाहेबांची भावावस्था आता एकच झाली होती. जणू तेही तुकारामांसारखेच वैकुंठगमन करण्यासाठी सिद्ध झाले होते! आणि मग –

आमचा राम राम घ्यावा

आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ।
तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनिया जन्मतुटी ॥

2 सप्टेंबर 1976 हा दिवस उगवला तोच एक दुःखद बातमी घेऊन! आपल्या सर्वांचे लाडके ऋषितुल्य साहित्यिक वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकरांनी आपणा सर्वांचा अखेरचा निरोप घेतला होता. जणू एक ऋषितुल्य सारस्वत एका जगद‍्गुरू संताच्या मार्गानंच गेला होता! त्या दिवशी गणेश विसर्जन होतं, हाही एक योगायोगच! आपल्या लाडक्या दैवताच्या विसर्जनाबरोबरच साहित्य क्षेत्रातील हे दैवतही काळाच्या उदरात गडप झालं होतं…! त्यांच्या सत्काराला चार महिनेही होतात न होतात, तोच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता!

घडलं असं की

भाऊसाहेबांची एक कन्या सौ. सुलभा कापडी या इस्लामपूरमध्ये राहायच्या. भाऊसाहेब त्यांच्याकडे विश्रांतीसाठी गेले होते. तिथेच बाथरूममध्ये ते पाय घसरून पडले. त्यांना मिरजेच्या वॉनलेस मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यानच त्यांचं 2 सप्टेंबर 1976 रोजी पहाटे निधन झालं आणि उभा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला!

त्याचवेळी आणखी एक जीवाला चटका लावणारी घटना घडली. त्यांची दुसरी कन्या सौ. मंगला पेंढारकर या त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी जयसिंगपूरहून निघाल्या होत्या. परंतु त्या तिथं पोचण्यापूर्वीच अवघी पंधरा मिनिटे आधी भाऊसाहेबांनी अखेरचा श्‍वास घेतला होता. नियतीनं नेमून दिलेले त्यांचे श्‍वास संपले होते.

‘काळासारखा दुसरा धन्वंतरी कुणी नाही. दुभंगलेलं हृदय कसं जोडावं आणि वठलेलं झाडं कसं पालवावं, हे त्याला कळत असतं!’
हा विचारही भाऊसाहेबांचाच. खांडेकरांना या भूतलावरून घेऊन जाताना त्यालाही परत पालवी फुटावी, असं त्या कळिकाळालासुद्धा वाटलं असेल; पण दुष्ट नियतीला ते कुठे मान्य होतं?

रणजित देसाई हमसून हमसून रडले

भाऊसाहेबांचं निधन झालं, तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील सांगलीतच होते. त्यांनी तत्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली आणि तिथून पार्थिव हलविण्याबाबत सर्व हालचाली केल्या. दादांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण केला तसेच सांगलीतील अनेक मान्यवरांनीही पुष्पहार अर्पण करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘स्वामी’कार रणजित देसाई हे भाऊंचे शिष्य. त्यांनीही तिथेच पुष्पहार अर्पण केला. मात्र, त्यांना दुःख आणि भावनावेग आवरता आला नाही. ते हमसून हमसून रडू लागले.

‘शब्दापेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असते, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.’
हा विचार मांडताना खांडेकरांसमोर रणजित देसाईच होते काय, असा प्रश्‍न पडावा. मात्र, देसाई यांच्यासाठीच काय; आमच्यासाठीसुद्धा हा खांद्यावरचा हात आता कायमचा दुरावला होता! भाऊसाहेबांचं पार्थिव कोल्हापूरला आणलंं जात असताना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रणजित देसाई आणि भाऊसाहेबांचे चिरंजीव अविनाश आपल्या पित्याची अखेरची सोबत करीत होते, तर वसंतरावदादांनी आपली गाडी भाऊसाहेबांच्या नातेवाईकांसाठी दिली होती.

बघता बघता ही दुःखद बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत जाऊन पोहोचली. जेव्हा त्यांचं पार्थिव रुग्णालयाच्या आवारात आणलं गेलं, तेव्हाच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सांगली-मिरजकरांनीही मोठी गर्दी केली होती. एखाद्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्यासाठीसुद्धा एवढी गर्दी झाली नसती. हा एका साहित्यिकाचा सन्मानच होता. त्यांचं पार्थिव कोल्हापूरला आणलं जात असतानाही वाटेत उदगाव, जयसिंगपूर, हातकणंगले, हेर्ले, शिरोली इत्यादी गावांत जागोजागी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले जात होते.

भाऊसाहेबांचं पार्थिव त्यांच्या राजारामपुरीतील ‘नंदादीप’ या बंगल्यात आणल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आणि जेव्हा तिथूनच त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा आपल्या भावनेला हात घालून लेखणीद्वारे आपली सुख-दुःखं मांडणार्‍या साहित्यातील या पितामहाच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी उसळली होती. धीरगंभीर वातावरणात त्यांच्या पार्थिवावर पंचगंगेकाठी अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या निर्वाणानं साहित्य क्षेत्रातील एक पर्व संपलं.

दुसर्‍या दिवशीच्या ‘पुढारी’मध्ये मी ‘अमर लेखणीचा विराम’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून त्यांना आदरांजली वाहिली.
भाऊसाहेबांच्या अंत्ययात्रेतसुद्धा त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याच्या आठवणींना उजाळा मिळत होता; पण आता ती सत्कारमूर्ती अनंतात विलीन झाली होती.

‘जन पळभर म्हणतील हाय हाय!
मी जाता राहील कार्य काय?’

असं जरी भा. रा. तांबे यांनी म्हटलं असलं तरी भाऊसाहेब हे शोकांतिकेचे लेखक नव्हते. ते सुखांतिकेचे साहित्यिक होते. म्हणूनच –
‘भग्‍न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही.

त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्नं भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्‍ताळलेल्या पायांनी दुसर्‍या स्वप्नामागून धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे.

मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!’ हा त्यांनी त्यांच्या ‘अमृतवेल’मधून ‘अमृततुल्य’ विचार जगाला दिला. आज ते देहानं जरी आपल्यात नसले तरी विचारांनी ते आपल्यात आजही आहेत आणि पुढेही राहतील, हे निश्‍चित.

sinhayan@pudhari.co.in

Back to top button