

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : भर दुपारची वेळ… गर्दीने गजबजलेला महालक्ष्मी चेंबर्सचा परिसर… दुचाकी-चारचाकींचीही वर्दळ… अचानक चौकात आलेल्या शिवशाही बसचा ब्रेकफेल झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस मागे नेत एका बंद दुकानगाळ्याच्या कठड्याला धडकवली. यामध्ये ४ दुचाकी व एका मोटारीचे नुकसान झाले. तर सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
पुणे- कोल्हापूर – पणजी ही शिवशाही आज (दि.२७) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रवासी घेवून मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली. महालक्ष्मी चेंबर्ससमोर काही प्रवाशी थांबल्याने बस बाजूला घेताना अचानक ब्रेकफेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. याकारणाने बस मागे जावू लागली. चालकाने बाजूच्या इमारतीतील बंद दुकानगाळ्याच्या कठड्याच्या दिशेने बस वळवली. ही बस कठड्याला धडकल्याने जागीच थांबली. मात्र, यावेळी येथील पार्किंगमध्ये थांबलेल्या ४ दुचाकी व एका मोटारीचे नुकसान झाले. या दुचाकी फरफटत नेल्याने बसच्या खाली आल्या.
मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नेहमी गजबजलेला असतो. महालक्ष्मी चेंबर्ससमोरही अनेक आरामबस थांबत असल्याने येथे प्रवासी मोठ्या संख्येने जमतात. याचठिकाणी शिवशाहीचा ब्रेकफेल झाला. बस मागे जात असल्याचे पाहणार्यांनी तसेच प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. काही समजण्याच्या आत चालकाने बस बाजूला नेत त्यावर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचलंत का ?