

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय भालाफेकपटू किशोर कुमार जेनाने (Kishore Jena) आशियाई क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने बुधवारी (4 ऑक्टोबर) पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. स्टार खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देत त्याने अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. नीरज चोप्राने 88.88 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून सुवर्णपदक पटकावले. तर, किशोरने 87.54 मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक जिंकले. जपानच्या गेन्की डीनने 82.68 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील किशोरचे हे पहिलेच पदक आहे.
किशोरचा (Kishore Jena) आशियाई क्रीडा स्पर्धेत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. आठ वर्षांपूर्वी व्हॉलीबॉल सोडून भालाफेकीचा खेळ स्वीकारलेल्या किशोरची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. त्याचे घर ओडिशातील पुरी जिल्ह्यातील कोठासाही गावात आहे. सहा बहिणींमधील सर्वात लहान भाऊ असणा-या किशोरचे वडील शेतकरी आहेत. सर्व मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही वडिलांनी किशोरची स्वप्ने पूर्ण कधीही आखडता हात घेतला नाही. किशोरपूर्वी व्हॉलीबॉल खेळत असे. 2015 मध्ये त्याने व्हॉलीबॉल खेळणे बंद करून भालाफेक या खेळात उडी मारली. भुवनेश्वर येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमधून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता तो पटियाला साई सेंटरचा एक भाग आहे.
किशोर हा गेल्या दोन वर्षांपासून घरी गेलेला नाही. देशासाठी भालाफेकीमध्ये पदके मिळवणे हेच त्याचे ध्येय आहे. आणि या ध्येयाने तो झपाटून सरावात मग्न आहे. तो ओडिसातील आपल्या घराची वाटही विसरलेला आहे. अखेरच्यावेळी तो 2021 मध्ये घरी गेली होता. किशोरच्या मते, ब्रेक घेतल्याने लय तुटते. किशोरच्या कुटुंबियांना स्मार्टफोन कसा वापरायचा हे माहीत नाही, त्यामुळे ते आपल्या मुलाला व्हिडिओ कॉलद्वारेही पाहू शकत नाहीत.
किशोर जेना (Kishore Jena) या वर्षी पहिल्यांदाच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होता. त्या स्पर्धेत तो पाचव्या स्थानावर राहिला. मात्र, त्यानंतर झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने मागिल अपयश पुसून टाकले आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील जेनाचे हे पहिले पदक ठरले आहे. आता त्याची नजर पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकवर आहे.