

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. केतकीवर राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केतकीच्या पोस्टचा निषेध केला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केतकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना खरपूस समाचार घेतला. केतकीला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चालतो. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला चांगल्या संस्काराचा वारसा घालून दिला आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रात खपवून घेतली जात नाही.
दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह केलेल्या पोस्टवर भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला. राज्यात अद्याप काही भागात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखाने बंद करू नयेत. याबाबत राज्य सरकारनेही सुचना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सारखे राज्य सरकार पडणार असल्याचे विधान करत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असते. ते म्हणाले की, राणे, चंद्रकांत पाटील सारख्या तारखा देत असतात. हे मी सतत वाचत, ऐकत असतो, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, ठाण्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता केतकी चितळेवर पुढे कोणती कारवाई होणार? की समज देऊन सोडून देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?