

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १२४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २३ जागांवर आणि अपक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११३ आहे. पण काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस १२० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धरामय्या हे वरुणा मतदारसंघात भाजपचे मंत्री व्ही सोमन्ना यांच्या विरोधात आघाडीवर आहेत. त्यांनी २०० पेक्षा जास्त जागा जिंकू असा अंदाज याआधी वर्तवला होता. दरम्यान, त्यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएसशी युती करण्यासही नकार दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक उद्या सकाळी बंगळूरमध्ये बोलावण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने पक्षाच्या सर्व आमदारांना बंगळूरला बोलावले असून पक्षाने बंगळूर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स बुक केल्याचे वृत्त आहे. (karnataka result 2023)
२२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा ११३ चा आहे. पण काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत १२१ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे.
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. "आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू. यात काही शंका नाही. पंतप्रधानांच्या प्रचाराचा प्रभाव पडला नाही" असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याने बंगळूरसह राज्यातील अनेक भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा १०० ते ११० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे; तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांत २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत १८७ उमेदवार लढले आहेत. (Karnataka Election Results 2023)
हे ही वाचा :