

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये आज (दि. 30) पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये खर्या अर्थाने 'न्याय आपल्या दारी' याची प्रचिती आली. नुकसानभरपाईच्या एका प्रकरणात खुद्द न्यायाधीशांनी कोर्ट हॉल सोडून न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन अपघातग्रस्त महिलेला 47 लाख 90 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्त केला. लोकअदालतीमध्ये मिळालेल्या झटपट न्यायाने अपघातग्रस्त महिला आणि तिच्या पतीच्या चेहर्यावर हसू उमटले.
नयना गणेश बोरा (रा. शिरूर) या स्कूटरवरून 28 ऑक्टोबर 2019 रोजी दैनंदिन कामकाजासाठी निघाल्या होत्या. त्या वेळी भरधाव आलेल्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात बोरा यांच्या डाव्या बाजूच्या कवटीला गंभीर दुखापत झाली. या अपघातामध्ये त्यांना पूर्ण अपंगत्व आले. याप्रकरणी बोरा यांनी अॅड. शशिकांत बागमार, अॅड. निनाद बागमार यांच्यामार्फत पुणे मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे कारमालक, कारचालक आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीविरोधात दावा दाखल केला.
आज (दि. 30) जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर, पॅनेल मेंबर गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा दावा तडजोडीअंती निकाली काढण्यात आला. या वेळी इन्शुरन्स कंपनीला 47 लाख 90 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. कंपनीतर्फे अॅड. सत्यजित लोणकर यांनी काम पाहिले.
बोरा या पूर्णपणे अपंग असल्याने विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर हे स्वतः कोर्ट हॉल सोडून न्यायालयाच्या गेटजवळ आले. त्यानंतर त्यांनी बोरा यांच्याकडे नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्त केला. या वेळी त्यांनी बोरा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी स्वतः तडजोडनाम्यावर बोरा यांच्या सह्या आणि अंगठा घेतला. या वेळी जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक, मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे चेअरमन न्यायाधीश क्षीरसागर उपस्थित होते.