

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बहीण विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील मुक्ता पब्लिकेशन हाऊस तसेच फार्महाऊसवर गुरूवारी आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
पुईखडी येथील विजया पाटील यांच्या घरातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केल्याचे समजते. अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावरही आयकर विभागाने आज छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बारामती (Baramati) औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (ED Raid Baramati)
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
ईडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. यासंबधी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
माझे नातेवाईक असल्याने धाड टाकल्याचे मला वाईट वाटत आहे. माझ्याशी सबंधितांवर छापा टाकला जातो याचा माझ्या नातेवाईकांना त्रास होत आहे. माझ्या नातेवाईकांनी सर्व आयकरचे नियम पाळले. राजकीय हेतुने धाड टाकली की कुठल्या हेतूने धाड टाकली याबाबत आयकर माहिती देईल, असे म्हणाले. मी दर्शनासाठी गेलो होते तेथून येताना छापा टाकल्याचे मला महिती मिळाली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
माझ्या कोल्हापूर आणि इतर ठिकाणच्या बहिणींच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. फक्त नाते असल्याने तीन बहिणींवर कारवाई केली जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापे आजसकाळ पासून टाकण्यात येत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापा टाकल्यामुळे अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.