पुढारी ऑनलाईन डेस्क
पश्चिम जर्मनीतील सोलिंगेन शहरात (Solingen stabbing attack) एका स्ट्रीट फेस्टिवलमध्ये हल्लेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात (knife attack) ३ लोक ठार झाले आहेत. तर किमान ८ जण जखमी झाले आहेत. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आणि शोधमोहीम सुरु केली. शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी बॅरियर्स लावण्यात आले आहेत.
शुक्रवारी रात्री सोलिंगेन शहराच्या (Germany city Solingen) फ्रॉनहॉफ या मध्यवर्ती चौकात एका अज्ञात हल्लेखोराने चाकूने अनेकांना जखमी केले. रात्री ९.३० नंतर प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावरुन हल्लेखोर पसार झाला. त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहराच्या ६५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या फेस्टिवलदरम्यान एका व्यक्तीने रस्त्यावरुन जाणाऱ्यांवर चाकूने वार केले. त्याने अनेकांच्या गळ्यावर चाकू फिरवले. रात्री ९.३० नंतर या घटनेविषयी पोलिसांना सतर्क करण्यात आले.
"पोलिस सध्या हल्लेखोरोचा शोध घेत आहेत," असे पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी विशेष तुकड्यांसह सोलिंगेन शहराच्या मध्यवर्ती भागात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. "सध्या पीडित आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे." असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सोलिंगेन शहराच्या ६५० व्या वर्धापनदिनानिमित्त "फेस्टिवल ऑफ डायव्हर्सिटी"चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिवल शुक्रवारपासून सुरू झाला. या निमित्ताने शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवर अनेक व्यासपीठे उभारण्यात आली आहेत. इथे लाइव्ह म्युझिक, कॅबरेट आणि ॲक्रोबॅटिक्सचे आकर्षण आहे. हा फेस्टिवल रविवारपर्यंत चालणार आहे.
सोलिंगेनचे महापौर टीम कुर्झबॅक (Solingen's mayor Tim Kurzbach) यांनी शहरातील फेस्टिवलदरम्यान झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. "या घटनेने सोलिंगेनमधील आम्हा सर्वांना धक्का बसला. ही घटना भयभीत करणारी आणि दुःखदायक आहे," असे त्यांनी शहराच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.