शिकागो : अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनाच्या समारोपात गुरुवारी रात्री पक्षातर्फे देण्यात आलेल्या अध्यक्षीय उमेदवारीचा टाळ्यांच्या गजरात स्वीकार केला. या देशाला ऐक्य, न्याय आणि प्रगतीच्या आधारावर उज्ज्वल भविष्याकडे नेण्यास आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यास त्याचे विनाशकारी परिणाम अमेरिकेवर होऊ शकतात, असा जळजळीत इशारा त्यांनी दिला.
हॅरिस यांनी सुमारे 40 मिनिटे केलेल्या भाषणात आपल्या आर्थिक तसेच परराष्ट्र धोरणाची ढोबळ रूपरेषा मांडताना मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यावर प्रामुख्याने भर दिला. हॅरिस यांच्या प्रत्येक घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. समारोपानंतर युनायटेड सेंटर या स्टेडियमच्या छतावरून अमेरिकेच्या राष्ट्रधजावर असलेले लाल, निळ्या आणि पांढर्या रंगाचे एक लाखाहून अधिक फुगे सोडण्यात आले. हे द़ृश्य लक्षवेधी ठरले. ही निवडणूक जिंकल्यास हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला तसेच भारतीय आणि कृष्णवर्णीय अशा संमिश्र वंशाच्या पहिल्या दक्षिण आशियाई अध्यक्ष होण्याचा मान मिळवतील.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या भाषणावर टीका करणार्या किमान 37 पोस्ट ट्रूथ सोशल या आपल्या खात्यावर टाकल्या. स्वतःच्या बालपणाविषयी कमला यांनी बरेच सांगितले. मात्र, सीमा ओलांडून बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत येत आहेत. महागाई, गुन्हेगारी वाढली आहे. याविषयी तुम्ही बोला, अशीही पोस्ट ट्रम्प यांनी टाकली आहे.
अमेरिकन अध्यक्षीय उमेदवारीचा मी प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या वतीने स्वीकार करीत आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची, वंशाची, लिंगाची असो. आपल्या जीवन प्रवासाची कहाणी जगातील केवळ या महान देशातच लिहिली जाऊ शकते. या सर्वांचे प्रतिनिधित्व मी इथे करीत आहे, अशा शब्दांत हॅरिस यांनी आपली स्वीकृती जाहीर केली.