

White House Security Breach :
मंगळवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाला. एका पुरूषानं व्हाईट हाऊसच्या बाहेरील सुरक्षा बॅरियर्सवर कार चढवली. व्हाईट हाऊसची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला त्वरित ताब्यात घेतलं. ही घटना मंगळवारी रात्री १०.३७ च्या सुमारास झाली होती.
सिक्रेट सर्व्हिसेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यााबबतचं अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं. सुरक्षा रक्षकांनी आरोपीच्या गाडीची तपासणी केली. मात्र त्यात आक्षेपार्ह असं काही आढळून आलेलं नाही. दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत अजून तरी अधिकची माहिती दिलेली नाही. त्यांनी व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याऱ्या चालकाची देखील ओळख अजून जाहीर केलेली नाही. या चालकाचा उद्येश काय होता याबाबत देखील पोलिसांनी माहिती दिलेली नाही.
दरम्यान, व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करतानाचा त्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरक्षा अधिकारी आरोपी व्यक्तीच्या क्रॅश झालेल्या कारची पाहणी करत आहेत. त्याचे फोटो घेताना दिसत आहेत. दरम्यान, सिक्रेट सर्व्हिसिसेनं याबाबत अजून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं.
व्हाईट हाऊसच्या गेटवर असा प्रसंग घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षी जानेवारी आणि मे महिन्यात देखील सुरक्षा गेटवर कार क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या होत्या. २०२४ मध्ये घडलेल्या घटनेवेळी तत्कालीन राष्ट्रपती हे व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते असं सुरक्षा दलांनी सांगितलं होतं.