Trump Celebrate Diwali : ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी... लावली ट्रेड, पाकिस्तान अन् युद्धची जुनीच टेप
Trump Celebrate Diwali :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी केली. त्यांनी भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. त्याच्यासोबत व्यापार आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं.
व्हाईट हाऊसमध्ये दीप प्रज्वलन करून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळी सेलिब्रेट केली. त्यानंतर त्यांनी भारतातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसंच मी तुमच्या पंतप्रधानांशी देखील बोलल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत चांगलं बोलणं झालं असंही ते म्हणाले.
'आम्ही व्यापाराबद्दल बललो, त्यांना त्यामध्ये जास्त रस होता. आम्ही यापूर्वी पाकिस्तानसोबत युद्ध नको याबाबत थोडं बोललो होते. त्या संभाषणात देखील व्यापाराचा मुद्दा होताच. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झालेलं नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षात ते माझे चांगले मित्र झाले आहेत.' डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, चीन सोबतच्या टॅरिफबाबत बोलताना ते म्हणाले, 'येत्या एक नोव्हेंबरपासून चीन स्वतःवर १५५ टक्के टॅरिफ लादून घेणार आहे. मला ते त्यांच्यासाठी योग्य आहे असं वाटत नाही. मी चीनसोबत चांगलं राहू इच्छितो. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्यासोबत वाईट वागत आहे कारण आपले आधीचे राष्ट्रपती व्यापाराच्या दृष्टीकोणातून तेवढे स्मार्ट नव्हते.'
त्यांनी मध्यपूर्व मधील परिस्थितीबाबत देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'आम्हाला संपूर्ण जगभरात शांतता हवी आहे. आम्हाला सर्वांना सोबत घ्यायचं आहे. मला मध्यपूर्वमधून कॉल आला होता. आम्ही तिथं चांगली कामगिरी करत आहोत. मध्यपूर्वमधील अनेक देशांनी शांततेसाठी करार केला आहे. कोणालाही हे शक्य होईल असं वाटलं नव्हतं.'
