

viral video child lying on reticulated python snake shocking video social media
पुढारी ऑनलाईन :
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका विशाल रेटिक्युलेटेड पायथन (जाळीदार अजगर) वर निर्धास्तपणे झोपलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
अजगरालाच बनवले खेळणे
व्हायरल व्हिडीओमध्ये एक मोठा आणि वजनदार अजगर जमिनीवर पडलेला दिसतो. त्याचवेळी एक व्यक्ती त्या अजगराचा काही भाग उचलून मुलीच्या अंगावर ठेवतो. त्यानंतर ती मुलगी कोणतीही भीती न बाळगता त्या अजगरावर जाऊन झोपते. पाहणाऱ्यांना तो एखादा पाळीव प्राणी वाटू शकतो, मात्र प्रत्यक्षात तो जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली सापांपैकी एक आहे.
हा व्हिडीओ अमेरिकेतील वन्यजीव इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर Mike Holston यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. माइक यांना "रिअल टार्झन" म्हणूनही ओळखले जाते. ते अनेकदा धोकादायक प्राण्यांसोबतचे व्हिडीओ पोस्ट करत असतात.
व्हिडीओ पाहताच नेटकरी संतापले
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, काही लोक लाईक्स, व्ह्यूज आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात.
एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, "जर अचानक साप आक्रमक झाला असता तर काय झाले असते?" तर दुसऱ्या युजरने म्हटले, "अशा धोकादायक प्राण्याजवळ मुलाला सोडणे ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे."
काहींनी तर पालकांनी व्हायरल होण्याच्या नादात मुलांच्या सुरक्षिततेशी असा खेळ करू नये, असेही स्पष्टपणे म्हटले.
हा अजगर किती धोकादायक असतो?
व्हिडीओमध्ये दिसणारा साप रेटिक्युलेटेड पायथन अर्थात जाळीदार अजगर असल्याचे सांगितले जात आहे. हा जगातील सर्वात अजगरांपौकी एक मानला जातो. याची लांबी साधारणपणे २० ते २२ फूट असू शकते. काही ठिकाणी तो ३० फुटांपेक्षाही अधिक लांब आढळला आहे. त्याचे वजन ७५ ते १५० किलोपर्यंत असू शकते.
हा साप विषारी नसला तरी त्याची ताकद अत्यंत धोकादायक असते. तो आपल्या शिकारीला चावून मारत नाही, तर आपल्या मजबूत शरीराच्या विळख्यात घट्ट पकडून गुदमरवतो. शिकार श्वास घेऊ शकत नाही, तेव्हा तो तिला पूर्णपणे गिळून टाकतो.
हा साप कुठे आढळतो?
रेटिक्युलेटेड पायथन प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये आढळतो. विशेषतः Indonesia मधील Sumatra, Java, Borneo आणि Bali या भागांत त्यांची संख्या अधिक आहे.
वेळोवेळी या अजगरांनी माणसांवर हल्ला केल्याच्या आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना गिळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
तज्ज्ञांचे मत काय?
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, कोणताही साप कितीही शांत दिसत असला तरी तो शेवटी एक वन्य प्राणीच असतो. त्यामुळे लहान मुलांना अशा प्राण्यांच्या अतिशय जवळ नेणे किंवा त्यांच्यासोबत खेळू देणे सुरक्षित मानले जात नाही.
हा व्हायरल व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत असला, तरी त्यातून एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होत आहे. काही सेकंदांच्या व्हायरल रीलसाठी मुलांच्या सुरक्षिततेला धोका पत्करणे योग्य आहे का? सध्या सोशल मीडियावर याच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा होत आहे.