

viral moment swedish climate minister romina pourmokhtari brings baby to eu meeting
पुढारी ऑनलाईन : लक्झेंबर्गमध्ये स्वीडनच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांच्या बाळासह सभागृहात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणात पालकत्वामुळे करिअर थांबत नाही असा महत्वाचा संदेश महिलांना दिला.
लक्झेंबर्ग येथे झालेल्या युरोपियन संघाच्या बैठकीत स्वीडनच्या मंत्री रोमिना पोरमोख्तारी या आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या मुलाला सोबत घेऊन सहभागी झाल्या आणि त्यांनी त्याच्यासह आपले भाषणही केले. त्यांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
रोमिना पोरमोख्तारी आपल्या तीन महिन्यांच्या मुलगा अॅडमला कडेवर घेऊन युरोपियन संघाच्या हवामान मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाल्या. युरोपियन संघाच्या इतिहासात इतक्या लहान बाळाने अधिकृत बैठकीत उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
"आई झाल्याने करिअर थांबत नाही"
बैठकीनंतर बोलताना रोमिना म्हणाल्या, "मी हे मुद्दाम केलं, कारण आई झाल्यामुळे महिलांचं करिअर थांबायला नको. महिलांना कुटुंब आणि करिअर यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडलं जाऊ नये."
३० वर्षीय रोमिना पोरमोख्तारी यांनी २०२२ मध्ये मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या वेळी त्या स्वीडनच्या सर्वात तरुण मंत्री ठरल्या होत्या. नुकत्याच त्या मातृत्व रजेनंतर कामावर परतल्या आहेत. दरम्यान, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत त्यांच्या पतीने पालकत्वाची रजा घेतली असून अॅडमची काळजी घेण्यासाठी तेही लक्झेंबर्गला गेले होते.
बैठकीनंतर काय म्हणाल्या?
रोमिना यांनी सांगितले की, अनेकदा विशेषतः महिला नेत्यांसमोर अशी धारणा निर्माण केली जाते की त्यांना कुटुंब किंवा करिअर यापैकी एकाचीच निवड करावी लागते. मात्र त्या या विचाराशी सहमत नाहीत.
त्यांच्या मते, योग्य सुविधा आणि अनुकूल परिस्थिती असेल तर महिलांना कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळता येतात. त्यांनी पुढे असेही म्हटले की, बैठकीत बाळाची उपस्थिती ही काही असामान्य गोष्ट मानली जाऊ नये. कार्यस्थळे आणि सरकारी संस्था अधिक लवचिक असाव्यात, जेणेकरून पालकांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत सार्वजनिक कर्तव्येही पार पाडता येतील.
सर्वात कमी वयात मंत्रीपदाची जबाबदारी
रोमिना पोरमोख्तारी यांचा जन्म स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला. कमी वयात मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी यापूर्वीचा सर्वात तरुण मंत्री होण्याचा विक्रमही मोडला. त्यामुळे त्या स्वीडनच्या राजकारणातील एक प्रेरणादायी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात.