

vietnam social media ban under 16 kids post comment rule
पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर मुलांकडून होणाऱ्या मनमानी वापराला आळा घालण्याची तयारी जगभरात सुरू झाली आहे. आता 16 वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुले सोशल मीडियावर पोस्ट, रिपोस्ट, लाईक आदी गोष्टी करू शकणार नाहीत. तसेच मुलांनी सोशल मीडिया अकाउंट तयार करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. व्हिएतनाम सरकारने हा नियम आणण्याच्या तयारी केली आहे.
सोशल मीडियावर मनमानी पद्धतीने वापर करणाऱ्या मुलांवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. व्हिएतनाम सोशल मीडिया वापराबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, व्हिएतनाम सरकार यासंदर्भातील एका आदेशाचा मसुदा तयार करत आहे.
या प्रस्तावित नवीन नियमांनुसार, 16 वर्षांखालील मुले सोशल मीडियावर पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच इतरांच्या पोस्टवर कमेंट, लाईक किंवा अशा प्रकारच्या इतर प्रतिक्रिया देण्यावरही निर्बंध असतील.
या नियमांच्या तयारीसह व्हिएतनाम अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे, जे 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच देशात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी लागू केली आहे.
पालकांच्या परवानगीनंतरच सोशल मीडिया वापरता येणार?
व्हिएतनामने प्रस्तावित केलेल्या नियमांनुसार, 16 वर्षांखालील किशोरवयीन मुलांना पालक किंवा पालकत्वाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या माहितीच्या आधारे सोशल मीडिया अकाउंट रजिस्टर करता येणार आहे.
पालकांचीही असेल जबाबदारी
मुलांनी कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहावा आणि ते सोशल मीडियावर किती वेळ घालवतात, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असेल.
सोशल मीडिया कंपन्यांचीही जबाबदारी
व्हिएतनाम सरकारने तयार केलेल्या मसुद्यानुसार, सोशल मीडिया कंपन्यांचीही महत्त्वाची जबाबदारी असेल. कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्यांचे वय ओळखावे लागेल आणि मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य कंटेंटच दाखवला जात आहे, याची खात्री करावी लागेल.
मुलांच्या गोपनीयतेचीही घ्यावी लागणार काळजी
व्हिएतनामच्या प्रस्तावित मसुद्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मुलांच्या अकाउंटसाठी उच्च पातळीची प्रायव्हसी आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच हिंसा, अश्लीलता, जुगार, आत्महत्येशी संबंधित किंवा इतर हानिकारक कंटेंट ओळखून तो ब्लॉक करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील.
ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर फ्रान्सनेही 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ऑस्ट्रेलिया हा अशा प्रकारचा निर्बंध लागू करणारा पहिला देश ठरला असून, आता अनेक देश या दिशेने पुढे जात आहेत.