

US strike Iran airport
नवी दिल्ली: इराणमधील मशहद विमानतळावर भारताकडे झेपावण्याच्या तयारीत असलेल्या एका नागरी विमानावर अमेरिकेने हवाई हल्ला केला. इराणच्या 'महान एअर' या कंपनीचे हे विमान वैद्यकीय मदत आणि औषधे वाहून नेण्यासाठी एका मानवतावादी मोहिमेचा भाग म्हणून नवी दिल्लीला येणार होते, इराणने या घटनेला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि 'युद्धगुन्हा' म्हटले आहे.
हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे असताना हा हल्ला झाला. भारत आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय समन्वयांतर्गत औषधे आणि वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यासाठी या विमानाचा वापर केला जाणार होता. भारताने इराणला मदत सुरू केली असून, उभय देशांतील मानवतावादी संबंधांचा हा भाग होता. मात्र, या हल्ल्यामुळे नियोजित मदत मोहिमेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अमेरिकेने या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराणच्या नागरी विमान वाहतूक संघटनेने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "हे विमान केवळ नागरी सेवा देत नसून विविध देशांतून आणलेली जीवनरक्षक औषधे वाहून नेणार होते. अशा प्रकारे नागरी विमानाला लक्ष्य करणे हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण नियमांचा भंग आहे," असे इराणने म्हटले आहे.
इराणने या संदर्भात 'शिकागो करार (१९४४)' आणि 'माँट्रियल करार (१९७१)' या जागतिक कायदेशीर चौकटींचा हवाला दिला आहे. या करारांनुसार, नागरी विमानांना धोका निर्माण करणे हा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरतो. तसेच जिनिव्हा कराराच्या कलम ५२ नुसार, मानवतावादी मदत नेणाऱ्या नागरी वस्तूवर हल्ला करणे हा 'युद्धगुन्हा' मानला जातो.
महान एअर ही इराणमधील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी आहे. मात्र, अमेरिकेने या कंपनीवर अनेक वर्षांपासून निर्बंध लादले आहेत. या कंपनीचा वापर 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' कडून लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी केला जातो, असा अमेरिकेचा आरोप आहे; जो इराणने नेहमीच फेटाळून लावला आहे.