Abdul El-Sayed: अमेरिकेत निवडून आलेले पहिले मुस्लिम सिनेटर अब्दुल अल-सैयद कोण आहेत? भारताशी जवळचे संबंध

US Midterm Election Results 2026: अमेरिकेच्या राजकारणात इतिहास घडवत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल अल-सय्यद यांनी मिशिगनमधील अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते माइक रॉजर्स यांचा पराभव केला आहे.
Abdul El-Sayed
Abdul El-SayedFile Photo
Published on: 
Updated on: 

US Midterm Election Results 2026 Abdul El-Sayed:

नवी दिल्ली: अमेरिकेच्या राजकारणात इतिहास घडवत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल अल-सय्यद यांनी मिशिगनमधील अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते माइक रॉजर्स यांचा पराभव केला आहे. या विजयासह अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणारे ते पहिले मुस्लिम खासदार ठरले आहेत. विशेष म्हणजे, अब्दुल अल-सैयद यांचे भारताशीही जवळचे नाते असून, त्यांच्या पत्नीचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील भटकळ येथील आहे.

अब्दुल अल-सय्यद यांचा हा विजय केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नसून, अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्यांनी मिळवलेल्या या विजयाकडे संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागले होते.

Abdul El-Sayed
US Midterm Result 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; डेमोक्रॅट्स ४६ जागांसह आघाडीवर, विवेक स्वामी पराभवाच्या छायेत

भारताशी काय आहे अब्दुल अल-सैयद यांचे नाते?

अब्दुल अल-सय्यद यांचे भारताशीही खास नाते आहे. त्यांची पत्नी डॉ. सारा जुकाकू या मानसोपचारतज्ज्ञ असून, त्यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील भटकळ येथील आहे. भटकळ हे मंगळूरपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे.

एका मुलाखतीत भारताशी असलेल्या नात्याविषयी बोलताना अल-सय्यद म्हणाले होते, "माझे लग्न एका दक्षिण भारतीय कुटुंबात झाले असून, आता त्याला २० वर्षे झाली आहेत. या काळात मी त्यांच्या कुटुंबाचा आणि संस्कृतीचा पूर्णपणे भाग बनलो आहे."

ते पुढे म्हणाले, "खरं सांगायचं तर, कदाचित मी अरब असण्यापेक्षा भारतीय अधिक आहे. माझ्या पत्नीच्या कुटुंबाची मूळं भटकळमध्ये आहेत. मात्र, कुटुंबातील बहुतांश सदस्य आता बंगळूरमध्ये स्थायिक झाले आहेत. साराचे जवळचे नातेवाईक प्रामुख्याने अमेरिकेत राहतात."

सारा या जुकाकू शमसुद्दीन यांच्या नात आहेत. शमसुद्दीन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या नेतृत्वाखालील म्हैसूर संस्थानात अर्थ खात्याचे उपमंत्री म्हणून काम पाहिले होते. अब्दुल अल-सैयद यांची साराशी ओळख मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना झाली. अल-सैयद हे रोड्स स्कॉलरही राहिले आहेत. याच काळात त्यांचे साराशी प्रेमसंबंध जुळले आणि पुढे त्यांनी विवाह केला.

ट्रम्प म्हणाले होते 'जिहादी'

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्दुल अल-सय्यद यांच्यावर जोरदार टीका केली होती. ट्रम्प यांनी त्यांना 'जिहादी' असे संबोधत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. एका प्रचारसभेत बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, अल-सैयद यांना अमेरिकेत शरिया कायदा लागू करायचा आहे. ते म्हणाले, "जर तो कधी असे करण्यात यशस्वी झाला, तर सर्वप्रथम त्याच्यावर खटला चालवला पाहिजे. आणि त्या वेळी मी साक्षीदार असेन. मुस्लिम ब्रदरहूडचा एक जिहादी सदस्य अमेरिकेचा सिनेटर बनू नये, हे रोखण्यासाठीच मी येथे आलो आहे."

मात्र, ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही अब्दुल अल-सैयद यांनी मिशिगनमधील निवडणुकीत विजय मिळवत अमेरिकेच्या राजकारणात नवा इतिहास घडवला आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर

अब्दुल अल-सय्यद यांचा राजकीय प्रवास वैद्यकीय क्षेत्रातून सुरू झाला. निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, सुरुवातीला त्यांनी डॉक्टर होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. मात्र, लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांमागे केवळ वैद्यकीय कारणे नसून, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटीही जबाबदार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Abdul El-Sayed
Donald Trump Midterm Elections: निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का! कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच खुर्ची जाणार? भारतावर काय परिणाम होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.